सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने सारं कलाविश्व शोकसागरात बुडालं आहे. आत्महत्येनंतर आज दोन दिवसांनी नितीन देसाई यांच्या पार्थिवावर कर्जत येथील एन.डी. स्टुडिओवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन देसाई यांनी मराठीसह बॉलिवूड कलाकारांसोबतही बरंच काम केलं आहे. आज त्यांच्या अंतिम दर्शनाला मराठी कलाकारांनी हजेरी लावली. ज्या नितीन देसाईंनी अनेक बॉलीवूड चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले. त्या बॉलीवूडने नितीन देसाई यांच्या अंतिम दर्शनाकडे पाठ फिरवली आहे. केवळ अभिनेता आमिर खान त्यांच्या अंतिम दर्शनाला उपस्थित होता. (Aamir Khan on Nitin Desai)
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अंत्यदर्शनाला आमिर खानने उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना तो म्हणाला की, “ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. हे कसे घडले हे मला समजत नाही आहे. माझा विश्वास बसत नाही. माझी इच्छा आहे की त्यांनी जे केलं त्याऐवजी मदतीसाठी धाव घ्यायला हवी होती. पण अशा दु:खद परिस्थितीत आपण काय बोलणार, नेमकं काय झाले हे समजणे फार कठीण आहे. हे खूप दु:खद आहे.”
पाहा आमिर खान नेमकं काय म्हणाला (Nitin Desai Funeral)
“आम्ही खूप प्रतिभावान व्यक्ती गमावली आहे. मला त्यांना भेटू आठ दहा महिने झाले, त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या तीन ते चार महिने आधी मी त्यांना भेटलो. तेव्हा ते खूपच आनंदी दिसत होते. बॉलिवूड कलाकार यावेळी फार कमी प्रमाणात उपस्थित होते असा प्रश्न जेव्हा आमिरला विचारला यावर, आमिर म्हणाला, “कदाचित सगळ्या कलाकारांना येणं जमलं नसावं. पण ते सगळ्यांच्या मनात कायम आहेत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मी धैर्याने उभं राहण्याची देव त्यांना ताकद देवो असं म्हणेन.”
दरम्यान, त्यांच्या अंतिम दर्शनावेळी नितीन देसाईंचे कुटुंब आणि एनडी स्टुडिओमधील कर्मचाऱ्यांना यावेळी अश्रू अनावर झाले. नितीन देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई असा परिवार असून त्यांच्या अश्या जाण्याने नितीन देसाईंच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.