Nitin Desai Funeral : कलाक्षेत्रातील नावाजलेल्या कलादिग्दर्शकांपैकी नितीन देसाई यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. त्यांनी आजवर मराठीसह बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी उल्लेखनीय काम केलं. एनडी स्टुडिओ सारखा स्टुडिओ उभारण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. इतकंच नव्हे तर भव्यदिव्य स्टुडिओ त्यांनी सत्यातही उभारला. सगळं काही सुरळीत सुरु असताना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय त्यांनी का घेतला? हा प्रश्न आज अनेकांना सतावत आहे. बुधवारी (२ ऑगस्ट) सकाळी त्यांनी आत्महत्या केली असल्याची बातमी समोर आली. या घटनेनंतर मन सुन्न झालं. आज एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी सतत नवनवीन माहिती समोर येत आहे. मात्र या आत्महत्येमागचं कारण अजूनही उघड झालेलं नाही. पोलिस या प्रकरणासंदर्भात तपास करत आहेत. अनेक राजकीय मंडळींनी नितीन देसाईंना न्याय मिळावा म्हणून योग्य ती चौकशी व्हावी हा मुद्दा उचलून धरला आहे. तर दुसरीकडे आर्थिक अडचणींमधून त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.
नितीन देसाई यांनी टोकाचा निर्णय घेणं त्यांच्या कुटुंबियांसाठीही धक्कादायक आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिट्ठी लिहिली होती. या चिट्ठीमध्ये त्यांनी त्यांची शेवटची इच्छा नमुद केली. एनडी स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार व्हावे अशी नितीन देसाईंची इच्छा होती. त्याचनुसारच आज एनडी स्टुडिओमधील ‘जोधा अकबर’च्या सेटवर त्यांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं.
नितीन देसाईंना अखेरचा निरोप देत असताना उपस्थितांना अश्रु अनावर झाले. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांचाही अश्रूंचा बांध फुटला. वडिलांना अशा अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर मुलगी मानसी ढसाढसा रडू लागली. मुलीची अवस्था पाहून उपस्थितांनाही गहिवरुन आलं. त्याचबरोबरीने नितीन देसाईंच्या मोठ्या मुलीने त्यांना खांदा दिला. नितीन देसाईंच्या अंतिम विधींदरम्यान सगळ्यांचेच डोळे पाणावले होते. आजवर लाईट, कॅमेरा, अॅक्शनचा आवाज ज्या स्टुडिओमध्ये घुमला तिथे आज फक्त आणि फक्त शांतता होती.