Sanjay Dutt Married photo : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने पुन्हा एकदा सात फेरे घेतले असल्याचं समोर आलं आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी हा अभिनेता पुन्हा एकदा बोहोल्यावर चढला आहे. वास्तविक, संजय दत्तचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून असे दिसते आहे की, अभिनेत्याने चौथ्यांदा लग्न केले आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या पत्नीचा चेहराही समोर आला आहे. हे व्हायरल फोटो पाहून त्याने कोणाशी लग्न केले? याची चर्चा सुरु झाली. तर संजय दत्तने दुसऱ्या कोणाशी नाही तर त्याची तिसरी पत्नी मान्यता दत्तबरोबर दुसऱ्यांदा लग्न केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, अभिनेता मान्यताचा हात धरुन तिच्याबरोबर सातफेरे घेताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संजय दत्त भगव्या रंगाचा धोती-कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. मान्यता दत्त साध्या ऑफ व्हाइट सूटमध्ये दिसत आहे. या व्हिडीओशिवाय, मान्यताने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती आणि संजय हवनकुंडासमोर बसलेले दिसत आहेत. यावेळी संजय दत्तने पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केलेला दिसला. तर प्रिंटेड सूट घातलेली मान्यता हात जोडून प्रार्थना करताना दिसली.
या फोटोबरोबर मान्यताने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जय माता दी’. हे फोटो पाहून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले असले तरी स्वतः संजय दत्त किंवा मान्यता यांनी त्यांच्या पुनर्विवाहाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. संजय दत्तच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली आहे.
चार दशकांच्या आपल्या कारकिर्दीत संजय दत्तने १३५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ६५ वर्षीय संजय दत्तने तीन लग्न केले आहेत. त्याने १९८७ मध्ये रिचा शर्माशी पहिले लग्न केले. पण १९९६ मध्ये ब्रेन ट्युमरमुळे ऋचाचा मृत्यू झाला. यानंतर त्यांनी अभिनेत्री रिया पिल्लईशी लग्न केले, पण हे लग्न फार काळ टिकले नाही. यानंतर संजय दत्तने मान्यताबरोबर तिसरे लग्न केले. या लग्नापासून दोघांना २ मुले आहेत.