बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा खूप चर्चेत आला आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास सैफवर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला होता. अभिनेत्यावर सहा वेळा चाकूने वार केले. या हल्ल्यामध्ये त्याच्या मानेवर, हातावर व मणक्यावर गंभीर दुखापत झाली. त्याला लगेचच मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याच्यावर अडीच तास शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर अजून खोल जखम झाली असती तर त्याला लकवा मारला असता असेही सांगितले. मात्र त्याच्या जीवाचा धोका आता टळला असून लवकरच तो बरा होईल असेही डॉक्टरांनी सांगितले. (saif ali khan health update)
सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या मणक्यामध्ये अडीच इंचाचा चाकूचा तुकडा सापडला आहे. शस्त्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. मात्र काल रात्री उशिरापर्यंत त्याला शुद्ध आली. सध्या त्याचे कुटुंबं त्याच्याबरोबर आहे. तसेच तेथील स्टाफदेखील त्याची पूर्णपणे काळजी घेत आहे. त्याची परिस्थिती बघून दोन तीन दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल अशी माहितीदेखील डॉक्टरांनी दिली आहे. सैफचे डॉक्टर डॉक्टर नितीन डांगे यांनी त्याच्या तब्येतीबद्दल माहिती देताना सांगितले की,“सैफ अली खान आता पूर्णपणे ठीक आहेत. रात्री उशिरा त्याला शुद्ध आली. त्याच्या शरीरावर चार खोल जखमा व दोन किरकोळ जखमा झाल्या आहेत. यामधील एका जखमेमध्ये अडीच इंचाचा चाकूचा तुकडादेखील सापडला आहे. तो तुकडा जर अजून आतमध्ये असता तर त्याला लकवा मारण्याची शक्यता होती”.
दरम्यान या हल्ल्याप्रकरणी अनेक खुलासे केले जात आहेत. सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेबाबत पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, हल्ल्यापूर्वी आरोपीने सैफ धमकावले होते आणि पैसेही मागितले होते. हल्लेखोराचा जेहवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता असेही म्हटलं जात आहे.
पोलिसांनी दरोडा, घुसखोरी आणि गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्याप संशयितास अटक केलेली नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे संपूर्ण चोरीचे प्रकरण असल्याचे दिसते. पोलिसांची 10 पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत.