बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘डंकी’ या चित्रपटात दिसलेला अभिनेता वरुण कुलकर्णी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. त्याची किडनी निकामी झाली असून तो सध्या डायलिसिसवर आहे. त्यामुळे त्याला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. वरुण कुलकर्णीचे आठवड्यातून दोन दिवस डायलिसिस होत असून याचा खर्च हा अधिक आहे आणि या उपचाराचे वैद्यकीय बिल तो भरु शकत नाही. त्यामुळे अभिनेता सध्या मोठ्या आर्थिक संकटात पडला आहे. त्यामुळे वरुणच्या या आर्थिक संकटाच्या काळात त्याचा मित्र रोशन शेट्टीने सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन केले आहे. (Dunky fame Varun Kulkarni kidney failure)
वरुण कुलकर्णी यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. रोशन शेट्टीने त्याचा मित्र वरुणबद्दल आरोग्य अपडेट दिले आहेत. वरुणच्या या कठीण काळात लोकांनी त्याला मदत करण्याचे आवाहनही केले आहे. वरुणबद्दलची पोस्ट शेअर करत रोहितने असं म्हटलं आहे की, “माझा प्रिय मित्र आणि सहकलाकार वरुण कुलकर्णी सध्या किडनीच्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे आणि त्याच्या या उपचाराचा खर्च वाढतच आहे. त्याला आठवड्यातून २-३ वेळा डायलिसिस करावे लागते. शिवाय रोजच्या काही वैद्यकीय तपासण्याही कराव्या लागतात”.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “वरुण हा केवळ एक हुशार कलाकार नाही तर एक दयाळू आणि निस्वार्थी माणूस आहे. त्याने अगदी लहान वयातच आपले आई-वडील गमावले होते आणि तेव्हापासून तो सर्व अडचणींवर मात करत आपली रंगभूमीची आवड जोपासत आहे. त्याच्या या कठीण काळात वरुणला मदत करण्यासाठी आम्ही, त्याचे मित्र आणि हितचिंतक एकत्र येत आहोत. पण तुम्ही वरुणला वैयक्तिकरित्या ओळखत असल्यास थेट मदत पाठवू शकता”.
दरम्यान, वरुण कुलकर्णीने ‘डंकी’ चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली असली तरी त्याच्या या भूमिकेने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. राजकुमार हिरानीच्या या चित्रपटात तापसी पन्नू देखील होती. या चित्रपटाशिवाय वरुण कुलकर्णी ‘स्कॅम 1992’ आणि ‘द फॅमिली मॅन’ या बहुचर्चित सीरिजमध्येही दिसला होता.