बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन व शत्रुघ्न सिन्हा हे नेहमी चर्चेत असतात. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ व शत्रुघ्न हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. मात्र या दोघांच्या स्वभावात खूप अंतर आहे. अमिताभ हे वक्तशिर आहेत तर शत्रुघ्न हे बरोबर विरुद्ध आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी शत्रुघ्न हे सेटवर नेहमी उशिरा यायचे. याबद्दल स्वतः अमिताभ यांनी खुलासा केला आहे. शत्रुघ्न व अमिताभ यांनी एकमेकांबद्दल काय सांगितले? याबद्दल आपण जाणून घेऊया. तसेच एकमेकांची नक्की कशी मस्करी केली त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. (amitabh bachchan on shatrughan sinha)
अमिताभ व शत्रुघ्न एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. यावेळी अमिताभ यांनी एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले की, “आपल्या काही सवयी या नेहमीसाठीच असतात. पण त्या सोडणं गरजेचं असतं. शत्रुघ्न हे नेहमी असेच राहिले आहेत. ते ताज हॉटेलजवळ राहायचे. आम्ही नेहमी एकत्र फिरायचो. त्यावेळी माझ्याकडे जास्त काम नसायचं पण शत्रुघ्न मोठे स्टार होते. त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी जावं लागायचं. पण त्यांना ज्या ठिकाणी जायचं असायचं त्या ठिकाणी ते नेहमी तयार होऊन जायचे”.
पुढे ते म्हणाले की, “आम्ही त्यांना एकदा चित्रपट बघायला जाऊया असं म्हणालो. ते लगेचच तयार व्हायचे. कोणत्याच गोष्टीला ते नाही म्हणायचे नाहीत. पण त्यांची एक वाइट सवय होती. ते कुठेही वेळेत पोहोचायचे नाहीत. समजा चित्रपट ६ वाजता असेल तर ते ६.३० वाजता घरातून निघायचे. तसेच त्यांना फ्लाइट पकडायची असेल तरीही ते कधीही वेळेत पोहोचले नाहीत. त्यांना अनेकदा विमान चुकणार असल्याचेही फोन येत असत. पण ते आजपर्यंत बदलले नाहीत”.
तसेच पुढे अमिताभ यांनी सांगितले की, “आम्ही एकदा ‘हम दो’ चित्रपटांचे चित्रीकरण करत होतो. आम्ही एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करायचो. सकाळी सातपासून दुपारी दोन वाजपर्यंत व्यस्त असायचो पण शत्रुघ्न त्यांच्या सवयीप्रमाणे उशिराच पोहोचायचे”. दरम्यान शत्रुघ्न यांनी या सर्व सवयी बदलल्या असल्याचेही सांगितले.