‘अवंतिका’, ‘अवघाची हा संसार’, ‘वादळवाट’ या गाजलेल्या मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. काही वर्षांपूर्वी अभिनयाकडून अभिनेत्री मालिका निर्मिती क्षेत्राकडे वळली. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लागीर झालं जी’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकांची यशस्वीरित्या निर्मिती केली. सध्या झी मराठीवरीलच ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेच्या निर्मितीची धुरा त्या सांभाळत आहे. मनोरंजन विश्वात अभिनेत्री व निर्माती म्हणून लोकप्रिय असणाऱ्या श्वेता शिंदे सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच दिवाळी पाडवा निमित्त अभिनेत्रीने नवऱ्यासह ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी त्यांच्याबरोबर नवरादेखील होता. (Shweta Shinde and Sandeep Bhansali Lovestory)
दिवाळी पाडवा निमित्त ‘इट्स मज्जा’बरोबर झालेल्या खास संवादात दोघांना त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल विचारण्यात आले. यावेळी श्वेता यांच्या नवऱ्याने त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल असं म्हटलं की, “आम्ही दोघे एका सेटवर भेटलो. पहिल्या दिवशीच आमचं भांडण झालं. श्वेताच्या मित्राला भूमिका मिळाली होती. पण त्याला शेवटच्या क्षणी चॅनेलने काढलं. मग मला आणलं गेलं. मी ऑडिशन दिली. माझी कास्टिंग झाली. पहिल्या दिवशी मला यायला उशीर झाला. मग ही चिडली. त्यावर मी काय तरी बोललो आणि मग राडा झाला. त्यानंतर चार दिवसांनी श्वेताचा वाढदिवस होता. तेव्हा मी तिच्यासाठी केक मागवला. पण तिने याबद्दल काहीही माहीत नव्हतं. तिने केक कापला आणि सेलिब्रेशन झालं. अशी थोडी फिल्मी वाटणारी लवहस्टोरी होती”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “पुन्हा काही दिवसांनी पुन्हा आमची भेट झाली. मी हिंदी मालिकेचे शूटिंग करत होतो आणि श्वेता ‘चार दिवस सासूचे’ या मराठी मालिकेचे शूटिंग करत होती. तेव्हा आम्ही भेटलो आणि बोलत होतो, तेव्हा मालिकेच्या दिग्दर्शकाने आम्हाला पहिलं आणि तिला माझ्याबद्दल विचारलं. त्यानंतर आम्ही ‘चार दिवस सासूचे’ मालिकेमध्ये एकत्र आलो आणि त्यात मी श्वेताचा नवराच होतो. त्या मालिकेत श्वेता खलनायिका होती आणि मी तिला मारणारा, त्रास देणारा अशी माझी भूमिका होती. पण मग श्वेताने ते मनावर घेतलंआणि तिने मला असं म्हटलं की, तू माझ्याबरोबर हे सगळं केलं आहेस तर मी आता तुझ्याशीच लग्न करणार आणि मग आमचं लग्न झालं”.
यानंतर श्वेता यांनी त्यांच्या प्रपोजबद्दल सांगताना असं म्हटलं की, “मला मासे खायला आवडतात आणि खेकडे खाणे मला आवडते. आम्ही एकदा जुहूला एकेठिकाणी भेटलो होतो, तेव्हा त्याने मला खेकडा सोलून दिला आणि खेकड्यांची नांगी देत त्याने मला प्रपोज केलं. मग त्यावर मीदेखील त्याला तू यापुढेही अशीच खेकड्याची नांगी देणार असशील तर आपण लग करुयात असं म्हटलं. त्यानंतर आजही तो हे सगळं माझ्यासाठी करतो”. दरम्यान, श्वेताच्या नवऱ्याबद्दल बोलायचे झाले तर श्वेताचा नवरा हिंदीमध्ये प्रसिद्ध अभिनेता आहे. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर २००७ साली दोघे विवाहबद्ध झाले. श्वेताचा पती संदीप सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.