‘बॉलिवूडचा खिलाडी’ म्हणून मनोरंजन विश्वात लोकप्रिय असणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकत आला आहे. उमेदीच्या काळापसून ते आतापर्यंत त्याने अनेक उतमोत्तम चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अभिनेत्याने आजवर त्यांच्या अभिनयासह लाघवी स्वभावानेदेखील अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे आणि त्याचा हा स्वभाव साहजिकच त्याच्या मुलांमध्येदेखील उतरला आहे.
त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी एका पाळीव कुत्र्याने अक्षय कुमारच्या लहान मुलीच्या हाताचा जोरदार चावा घेतला. पण तरीही अक्षयच्या मुलीने तो केवळ एक अपघात होता असं म्हणत तिची भूतदया, प्राण्यांवर असलेले प्रेम व्यक्त केलं आहे. याचा खुलासा स्वत: अक्षयच्या पत्नीने म्हणजेच अभिनेत्री ट्विंकल खन्नाने केला आहे. ट्विंकल खन्ना ही सध्या मनोरंजन सृष्टीत अभिनेत्री म्हणून कार्यरत नसली तरी ती सध्या लेखिका म्हणून काम करत आहे. ती काही वर्तमानपत्र व मासिकांसाठी स्तंभलेखनही करते.
नुकतंच एका मुलाखतीत ट्विंकलने ख्रिसमसच्या सुट्टीत मुलगी निताराच्या दोन्ही हातांना त्यांच्या पाळीव कुत्र्याने चावल्याचे सांगितले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’साठी लिहिलेल्या स्तंभामध्ये, अभिनेत्रीने तिच्या चुलत भावाचा पाळीव कुत्रा फ्रेडी व तिच्या मुलीमध्ये असलेल्या छान नात्याविषयी सांगितलं. निताराला पाळीव प्राणी खूप आवडत असून कुत्र्यांवर तिचे विशेष प्रेम असल्याचे ट्विंकलने सांगितले.
आणखी वाचा – …अन् ते प्रकरण भोवलं! अखेर ‘त्या’ वक्तव्यावरुन पुष्कर जोगने BMC कर्मचाऱ्यांची मागितली माफी
ट्विंकलने या संपूर्ण घटनेचं वर्णन करत असं म्हटलं की, “या ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये, फ्रेडी जवळपास असताना कोणीतरी चुकून मुलांसमोर चिकनची प्लेट ठेवली होती. त्याने प्लेटवर उडी मारली आणि ते खायला सुरुवात केली. माझ्या ११ वर्षाच्या मुलीला भीती वाटत होती की फ्रेडी लाकडासह चिकन गिळून टाकेल. त्याने ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यादरम्यान त्याने निताराचे दोन्ही हात चावले.” यापुढे ती असं म्हणाली की, “तीन रेबीज व एक टिटॅनसचं इंजेक्शन मिळाल्यानंतरही निताराने तिच्या पाळीव कुत्र्याचीच बाजू घेतली आणि घडलेल्या घटनेला निव्वळ ‘अपघात’ म्हटले.”