Bigg Boss Marathi 5 : काही दिवसांपासून ‘बिग बॉस’ मराठी’च्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरु होती. हे पर्व सुरु झाल्यापासून अनेक ट्विस्ट बघायला मिळाले. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाईदेखील पाहायला मिळाली. भांडण, हाणामारी, शाब्दिक वादावादी यामुळे या कार्यक्रमाला अधिक रंगत चढली. या घरातली वादावादी जितकी चर्चेत आली, तितकीच या घरातील नातीही गाजली. ‘बिग बॉस’च्या घरात प्रेमाच्या नात्यांसह बहीण-भाऊ हे नातेही फुलले. यापैकी एक नाते म्हणजे डीपी अर्थात धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर. हे दोघे घरात येण्याच्या आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. मात्र घरात येताच दोघे भाऊ-बहीण बनले. (Bigg Boss Marathi 5 Dhananjay Powar)
‘बिग बॉस’च्या घरात खेळाच्या सुरुवातीपासून दोन गट पडलेले पाहायला मिळाले. त्यामध्ये अभिजीत सावंत, सुरज चव्हाण, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर ही मंडळी टीम बी मध्ये होती. मात्र या ग्रुपमध्येसुद्धा बरेचदा खटके उडताना पाहायला मिळाले. कधी अभिजीतवरुन ग्रुपमध्ये भांडणं झाली. तसेच अनेकदा डीपी यांनाही या ग्रुपमध्ये एकटे असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र खेळण्याचा निर्णयही घेतला. त्यामुळे दोघांच्या नात्यात अनेकदा मतभेदही झाले. अशातच या दोघांच्या नात्यावर डीपी यांनी भाष्य केलं आहे.
‘बिग बॉस’ संपताच डीपी यांनी इट्स मज्जासही खास संवाद साधला. यात त्यांनी असं म्हटलं की, “घराबाहेर आल्यानंतर आमचं बोलणं वगैरे झालं आहे. पण आम्ही अजून त्या मुद्द्यांवर चर्चा केलेली नाही. मला तिच्याकडून जाब किंवा उत्तर नको आहे. मी बहिणीचं नातं मानलं आहे. मी तिच्याकडून त्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे किंवा माझ्याकडून तिने अपेक्षा करणेही चुकीचे आहे. पण मी अपेक्षा केली आणि तिने केली की नाही हे ‘बिग बॉस’चे भाग पाहिल्यानंतर माझ्या पाठीमागे काय घडलं हे बघितल्यानंतर समजेल”.
आणखी वाचा – निक्की तांबोळी व अरबाज खानची घराबाहेर आल्यानंतर पहिली भेट, शेअर केला सेल्फी, आईच्या विरोधानंतरही नातं कायम
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “मला तिच्याकडून उत्तरांची गरज नाही. तसंच तिने सांगितलं आहे की, मला ती एखादा भाग बघून तुम्ही तेव्हा माझ्याबद्दल असं का म्हणाला होतात हे विचारणार आहे आणि मला त्याचे स्पष्टीकरण हवं आहे. त्यामुळे आमच्यात नाते अगदीच चांगलं आहे आणि ते हळूहळू अजून विकसित होईल किंवा माझ्याकडून तरी प्रयत्न राहील. आता तिने कसं स्वीकारायचं हा तिचा प्रश्न आहे”. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी सीजन ५ ‘चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आणि बारामतीचा टिक टॉक स्टार सुरज चव्हाण हा महाविजेता ठरला.