Suraj Chavan Fan Moment : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणचं संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर सूरजने नाव कोरलं. यंदाची ही मानाची ट्रॉफी बारामतीत गेली. सूरज चव्हाण हे नाव ‘बिग बॉस’ आधी टिक टॉकमुळे चर्चेत आले होते. टिक टॉकवर विविध गमतीशीर रील व्हिडीओ शेअर करत त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावर सूरजचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ‘बिग बॉस मराठी’ मुळे सूरजच्या चाहत्यावर्गात भर पडलेली दिसली. सूरजने ‘बिग बॉस’मध्ये मोठं यश मिळवल्यानंतर अनेक कलाकारांनी त्याची भेट घेतली. गावात मोठी मिरवणूक काढण्याबरोबर विविध ठिकाणी त्याचा सत्कार समारंभ पार पडला.
अशातच सूरजने आता एक शाळेला भेट दिली असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शाळकरी मुलांच्या भेटीसाठी सूरज पोहोचला असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. अगदी शालेय मुलंही सूरजच्या चाहत्या वर्गात मोडतात. अतिशय जल्लोषात साऱ्यांनी सूरजचं स्वागत केलं. प्रत्येकाच्या डोळ्यात सूरजला भेटण्याचा आनंद पाहायला मिळत होता. सूरजच्या एंट्रीवर तर साऱ्यांनी सूरज सूरज असं म्हणत एकच कल्ला केला.
सूरज चव्हाणने नुकतीच पुण्यातील ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी (सणसवाडी)’ येथे भेट दिली. सूरजला पाहण्यासाठी सर्व विद्यार्थी शाळेच्या पटांगणात जमा झाले होते. सूरजची एन्ट्री होताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सूरज सूरज अशी हाक देण्याबरोबरचं टाळ्यांच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांनी सूरजचं स्वागत केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. सूरजने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सूरजचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. “लहान मुलांचा आनंद सांगून जातो की, तू काय कमवलं आहेस तुझ्या आयुष्यात”, “याला म्हणतात खरी माणसाची जगाला ओळख. शाळेत न जाणारा मुलगा आज शाळेत आमंत्रण घेऊन प्रमुख पाहुणा म्हणून आला. खऱ्या माणसाला या जगाची ओळख व्हायला थोडा वेळच लागतो. जिंकलंस सूरज”, अशा असंख्य कमेंट करत त्याला पाठिंबा दर्शविला आहे.