‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या खूप गाजलं आहे. पाचव्या पर्वाचा अंतिम सोहळा काही तासांतच पार पडणार आहे. या पर्वाचा विजेता कोण होणार? हे लवकरच समजणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा याकडे लागल्या आहेत. यंदाच्या या पर्वात सहा फायनलिस्ट उरले असल्याचे दिसतेय. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि धनंजय पोवार हे स्पर्धक ‘बिग बॉस’चे सहा फायनलिस्ट ठरले आहेत. या सहा स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक विजेतेपदावर नाव कोरणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिले आहे. (bigg boss marathi update)
दरम्यान गेल्या आठवड्यात घरातून वर्षा उसगांवकर बाहेर पडल्या. यावेळी त्यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या. ‘इट्स मज्जा’बरोबर देखील त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारले की, “जेव्हा फॅमिली स्पेशल एपिसोडदरम्यान तुमची बहिण भेटायला आली होती पण तुम्हाला पती येणं अपेक्षित होतं. त्यानंतर तुम्ही आता बाहेर आला आहात तर पतीला पहिल्यांदा भेटल्यावर काय प्रतिक्रिया होती?”, वर्षा यांनी उत्तर दिलं की, “आम्ही दोन महिन्यांनंतर एकमेकांना भेटलो होतो. पण तेव्हा मी त्यांच्याबद्दल तक्रार असल्याचेही सांगितले. त्यांना मी म्हटलं की फॅमिली स्पेशल एपिसोडमध्ये तुम्ही यायला हवं होतं. कारण जेव्हा दार उघडलं तेव्हा माझ्या पतीची मूर्तीच दिसल्यासारखं वाटलं.ते दिसले नाहीत तेव्हा मला प्रचंड धक्का बसला. पण समोर मुलगी दिसली. ती माझी बहीण मनीषा होती”.
पुढे त्या म्हणाल्या की, “माझ्या डोळ्यात खूप अश्रु होते. मला बहिणीला भेटून आनंद झाला पण माझे पती भेटायला यायला हवे होते. त्यावेळी ते सिंगापुर येथे होते त्यावेळी येऊ शकले नाहीत. तसेच सगळ्यांना फॅमिली बाईट्स मिळाले पण मला काही नाही मिळालं. मी याविषयी त्यांना खूप बोलले. माझ्या पतीला कॅमेरासमोर यायला आवडत नाही. पण याबाबतीत तरी त्यांनी हा नियम मोडायला हवा होता असंही मी म्हणाले”.
नंतर त्या म्हणाल्या की, “मी इतके दिवस घरापासून लांब आहे. माझ्याही काही अपेक्षा आहेत. त्यांना मी म्हंटलं की तुमच्या जागी जर मी असते तर काय केलं असत? तुम्हाला वाईट नसतं का वाटलं? ते म्हणाले की तू जर फायनलला गेली असतीस तर मी येणार होतो. त्यांची कारणं मला योग्य वाटली नाहीत. पण त्यांना भेटून मला खूप छान वाटलं”. दरम्यान वर्षा यांची मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.