Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाच्या पर्वात ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. वर्षा उसगांवकर यांनी अगदी पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरात स्वतःच असं साम्राज्य उभं केलं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. त्यांच्या शाब्दिक व विनोदी बुद्धिमत्तेने त्या साऱ्यांच्या वरचढ ठरल्या. वर्षा यांनी आजवर चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिले असून सिनेविश्वात त्यांचं नाव अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे कायमच इतक्या वर्षांचा प्रवास केल्यानंतर वर्षा यांचा आदर हा साऱ्यांच्याच मनात असलेला पाहायला मिळतो आणि या आदरापोटी, या प्रेक्षकांच्या प्रेमापोटी वर्षा ‘बिग बॉस’च्या घरात ७० दिवसांपैकी ६७ दिवस तग धरुन राहिल्या.
मात्र नुकत्याच झालेल्या मिड विक एलिमिनेशनमध्ये वर्षा यांना घराबाहेर पडावे लागले. फिनालेच्या जवळ येऊन घराबाहेर पडणे हे अनपेक्षित असल्याचं म्हणत वर्षा यांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली. मात्र हा प्रवास उत्तम होता असं म्हणत त्यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी देखील पोस्ट केली. आता वर्षा घराबाहेर पडल्या असून त्या माध्यमांना मुलाखती देताना दिसत आहेत. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत वर्षा यांनी पॅडी बरोबरच्या त्यांच्या वागणुकीबद्दल भाष्य केलेलं पाहायला मिळतेय. वर्षा यांचा झालेला अपमान असो वा टास्क दरम्यान असो पॅडी कधीच वर्षांच्या बाजूने उभा राहिला नाही यामुळे बरेचदा तो घराबाहेर ट्रोलही होताना दिसला.
आणखी वाचा – धावत आला, मिठी मारली अन्…; Bigg Boss च्या घरात अरबाजची एण्ट्री, निक्की विचारणार जाब, व्हिडीओ व्हायरल
आता यावर वर्षांनी पॅडी बद्दल स्वतःचं मत व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे. वर्षा बोलताना असं म्हणाल्या की, “आमचा बॉण्डबद्दल सांगायचं तर, इंडस्ट्रीमध्ये मी आजपर्यंत पंढरीनाथबरोबर कुठलंही काम केलेलं नाही आहे. पण मला त्याच्याबद्दल सदभावना होती आणि अजूनही आहे. पण ‘बिग बॉस’च्या घरात आमचे खटकेच उडाले. सुरवातीला मला त्याच वागणं, बोलणं योग्य वाटलं. कोणतीही तक्रार न करता तो त्याची काम करायचा. पण नंतर नंतर मला असं वाटलं की, तो उगाच टोमणे मारतोय. कारण त्याला थोडंसं टोचून बोलायची सवय आहे. ते मला अजिबात आवडत नाही. कारण नसताना टोचून बोललेलं मला अजिबात नाही. असं दोन-तीन वेळा झालं. आणि त्याने मला एक प्रश्न विचारला तो मला अवाजवी वाटला”.
पुढे त्या म्हणाल्या, “त्याने मला सांगितलं, ही तुमची खूप काळजी करते, त्या टास्कमध्ये तुम्हाला लागलं का?, हे तिचं विचारणं तुम्हाला प्रामाणिक वाटतं का?, ती चांगली आहे का?, मग आधीचं तुम्ही सर्व विसरलात का?, हा काय प्रश्न झाला. अशा प्रकारचं त्याच टोचून बोलणं, आणि त्याची ही विचारसरणी मला अजिबात पटली नाही. त्यामुळे त्याच आणि माझं अजिबात पटलं नाही. एव्हिक्ट झाल्यावर जाताना त्याने माझी माफी मागितली. अर्थात मी त्याला माफ केलं. आणि ते काही मी मनात धरेन असं नाही आहे”.