Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ सुरु झाल्यापासून या पर्वाची खूप चर्चा सुरु आहे. यंदाच्या या पर्वात प्रत्येक स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहे. यंदाच्या या पर्वात एका स्पर्धकाची विशेष चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली तो स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आज सूरजला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. केवळ प्रेक्षकच नव्हे तर कलाकार मंडळीही सूरजला सपोर्ट करताना दिसत आहेत. काल झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी स्पर्धकांची शाळा घेतली. यावेळी रितेशने सूरजच भरभरुन कौतुक केलेलं पाहायला मिळालं.
भाऊच्या धक्क्यावर, “सूरज आजचा तुमचा लूक चांगला आहे. तुम्ही ‘बिग बॉस’च्या घरात काय काम करता?”, असा प्रश्न रितेश देशमुख सूरज चव्हाणला विचारतो. यावर उत्तर देत सूरज म्हणतो, “गार्डनमधील कचरा काढतो”. यावर रितेश म्हणतो, “मी ‘बिग बॉस’ हिंदीचे १६ सीझन पाहिले आहेत. मराठीपण पाहिले आहेत. इतर भाषेतीलही पाहिले आहेत. त्यामध्ये असं जाणवत की, प्रत्येक कामाची मूल्यता आखली जाते. प्रत्येक कामाचा दर्जा ठरवला जातो. जस की, किचनमध्ये केलं जाणार काम हे जास्त महत्त्वाचं आहे. तर सर्वात कमी लेखलं जाणार काम म्हणजे साफसफाई”.
पुढे रितेश म्हणाला, “बऱ्याच सीझनमध्ये मी हे पाहिलं आहे की त्या कामाकडे अशा नजरेने पाहतात की, त्या कामाला हात लावायचा नाही. पण सूरज ‘बिग बॉस’च्या इतिहासात तुम्ही एकमेव आहात ज्याने या कामाला कमी लेखलं नाही. सगळे ड्युटी म्हणून साफ करतात. मला अभिमान वाटतो हे सांगायला की, तुम्ही हे घर स्वतःच घर म्हणून साफ करताय. बिग बॉस’च्या घरात असा एक स्पर्धक असेल ज्याने या घराला आपलं घर मानलं असेल तर सूरज चव्हाण ते तुम्ही आहात. सूरज आपण घरातील धूळ, कचरा काढता तेव्हा नकारात्मकता बाहेर जाते. मला कळतंय तुम्ही टास्क खेळायला घाबरता. कसं बोलायचं, काय बोलायचं याच दडपण येत. बाकीच्यांना समजत मला का कळत नाही. याचा तुम्ही विचार करता”.
सूरजला पाठिंबा देत रितेश असंही म्हणाला की, “सूरज तुम्ही भिडा, नडा. आणि तो तेज तुमच्यात मला दिसला. एका बुक्कीत तुझं मुंडक छाटिन, हे सांगितलं तुम्ही एक हिंमत दाखवली. तुम्ही काय बोलताय ते कोणाला कळत असेल का असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचा विचार करु नका. कोणाला फरक पडत नाही. तुम्ही पण फरक पाडून घेऊ नका. समोरच्याला कळलं नसेल तर तुमचं मत मांडा. इथं जरी लोक ऐकत नसतील तर महाराष्ट्र ऐकत आहे”.