Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये नव्या स्पर्धकांनी अल्पावधीतच राडा घालायला सुरुवात केली आहे. एकापेक्षा एक वरचढ असलेले स्पर्धक यंदाच्या या पर्वात धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यंदाच्या या पर्वात निक्की तांबोळी ही स्पर्धक अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धकाबरोबर निक्कीची बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे रितेश देशमुखने भाऊचा धक्का मध्ये निक्कीची चांगलीच शाळा घेतली. यापाठोपाठ आता ‘बिग बॉस’च्या घरातील आणखी एक स्पर्धक सगळ्यांच्या नजरेत आली असून बरीच ट्रोल होताना दिसत आहे. ही स्पर्धक म्हणजे जान्हवी किल्लेकर.
जान्हवीचा ‘बिग बॉस’च्या घरातील उर्मटपणा, अतिशयोक्तीपणा साऱ्यांना खटकू लागला आहे. जान्हवीने वर्षा ताईंचा केलेला अपमानही साऱ्यांना खटकला. केवळ प्रेक्षकच नव्हे तर कलाकार मंडळीही जान्हवीवर भडकलेले दिसले. भाऊचा धक्कामध्ये रितेश देशमुखने जान्हवीची चांगलीच शाळा घेतली. ‘बिग बॉस’च्या या घरात आता दोन गट पडले आहेत. त्यापैकी एका गटात निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, घनःश्याम दरवडे हे स्पर्धक दिसत आहेत. मात्र या स्पर्धकांमध्येही आपापसांत वाद पाहायला मिळाले.
निक्कीचा आवाज, निक्कीची दादागिरी, निक्कीची स्ट्रॅटर्जी आता तिच्याबरोबर असलेल्या स्पर्धकांनाही खटकू लागली आहे. जान्हवी निक्की विरोधात बोलताना दिसली होती. जान्हवी वैभवला सांगत होती की, “मला हे लोक नाही आवडत. सगळे चुकीचं वागत आहेत, खोटं वागत आहेत. आपण गोष्टी करतोय आणि निक्की क्रेडिट घेऊन जातेय. आपलं प्लॅनिंग चुकीचं आहे. निक्कीच्या डोक्यात पण ही गोष्ट आली नव्हती”. आता जान्हवीच्या या चुगलीचा रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर खुलासा केला आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख जान्हवीला सगळ्यांसमोर बोलतो की, “जान्हवी ऐका. मी जे बोलतोय ते खरं बोलतोय. तुम्ही लिव्हिंग एरियामध्ये सोफ्यावर बसला होता. आणि रडत होतात. तेव्हा तुम्ही सांगितलं, सगळं आपण करतोय आणि सगळ्या प्लॅनिंगच क्रेडिट निक्की घेऊन जात आहे”. हे ऐकून निक्कीला पण धक्का बसतो. निक्की काय असं म्हणते. त्यानंतर बेडरूममध्ये येऊन जान्हवी हुंदके देत रडू लागते. तेव्हा तिथे धनंजय व छोटा पुढारी येतो आणि जान्हवीला पाणी देतात. त्यांनतर अचानक जान्हवीला चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडते. तेव्हा घरातील सर्व सदस्य धावत मदतीला पुढे येतात.