Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी सीझन ५’ हे पर्व विशेष चर्चेत असलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वात निक्की तांबोळी आणि आर्या जाधव या दोन स्पर्धकांची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात दोघींमध्ये झालेला वाद आता विकोपाला पोहोचला आहे. आर्याने निक्कीला शोमध्येच कानाखाली मारलं त्यामुळे आर्याला शोमधून बाहेर काढण्यात आलं. आर्या घराबाहेर येताच प्रेक्षकांनी मात्र तिची बाजू घेतली, आणि तिला पाठिंबा दिला. घराबाहेर आल्यानंतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघींमधील वाद हा सुरु असलेला पाहायला मिळतोय. निक्की व आर्याने एकमेकींवर केलेली टीका सध्या चर्चेत आली आहे. आर्याने रॅपच्या माध्यमातून निक्कीला सणसणीत टोला लगावला आहे.
आर्याच हे रॅप विशेष चर्चेत आलेलं पाहायला मिळालं. यानंतर निक्कीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली. निक्कीने ही स्टोरी शेअर करत ‘एक मोटा हाथी’ असं बालगीत लावून आर्याला अप्रत्यक्षपणे वजनावरुन ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. निक्कीच्या फॅन पेजवरुन आर्याला बोल लागवण्यात आले आहेत. यानंतर निक्कीने ही स्टोरी रिपोस्ट केलेली पाहायला मिळत आहे.
या स्टोरीमध्ये असं म्हटलं आहे की, “मुली. तू निक्कीच्या नावावर अजून किती फुटेज घेणार आहेस. शोमध्ये सुद्धा सतत तुझ्या तोंडात निक्कीचं नाव असायचं. आता तू निक्कीच्या नावाने हे नवीन भजन गायला सुरुवात केली आहेस. आयुष्यात थोडी पुढे जा. अजून किती दिवस निक्कीच्या नावावर फुटेज खाणार? शो संपला! स्वत:च्या हिंमतीवर पुढे जा आणि विसरु नकोस तुला त्या घरातून बाहेर काढलंय”. निक्कीच्या फॅनपेजवरुन शेअर केलेली ही स्टोरी अभिनेत्रीने रिशेअर करत, “आय लव्ह यू Nikkians! सर्वांनी माझ्या नावाने फुटेज घ्या कारण ब्रँड सर्वांनाच आवडतो”, असं म्हटलं आहे. या स्टोरीला निक्कीने “एक मोटा हाथी” हे गाणं लावत आर्याला अप्रत्यक्षपणे वाढलेल्या वजनावरुन ट्रोल केलं आहे.
निक्कीच्या या पोस्टवर उत्तर देत आर्याने शेअर केलेली पोस्टही लक्ष वेधून घेत आहे. आर्याने वजन काट्यावर उभं राहून तिचं सध्याचं वजन जाहीरपणे सर्वांना सांगितलं आहे. सध्या तिचं वजन ७०.२ किलो असून, “३० नोव्हेंबरपर्यंत मी ६० किलो वजन करेन” असं तिने जाहीरपणे सांगितलं आहे. तसेच “मी वजन कमी करण्यात यशस्वी झाले नाही तर, बँकेतून १ लाख रुपये तुला ट्रान्सफर करेन” असंही आर्या या व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.