Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकामागोमाग एक कलाकार मंडळी धुमाकूळ घालत असतानाच मराठमोळी अभिनेत्री योगिता चव्हाणची एक्झिट पाहायला मिळाला. चौथ्या आठवड्यात योगिताचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे. सुरवातीचे दोन आठवडे योगिता शांतपणे खेळत होती. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात योगिताने टास्कदरम्यान चांगलाच इंगा दाखवला. खुद्द रितेश देशमुख यांनी योगिताच कौतुक केलं. मात्र योगिताने भाऊच्या धक्क्यावर केलेलं भाष्य खूप धक्कादायक होतं. उत्तम खेळ खेळणाऱ्या योगिताने हा शो सोडण्याबाबत भाष्य केलं.
‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर पहिल्याच दिवशी योगिता भावुक झालेली दिसली. यावेळी तिला नवऱ्याची आठवण येऊ लागली, असल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर योगिताने “सर मला काही गोष्टींचा खूप मानसिक त्रास होत आहे. आणि मला माहित नाही हे बोलणं कितपत योग्य आहे. पण मला खरंच बाहेर यायचं आहे. मी संपूर्ण टीमची माफी मागते. इथे खूप लोक बोलतात की तू यायलाच नाही पाहिजे होतं. आणि त्यांचं बोलणं अगदी बरोबर आहे. कदाचित माझा निर्णय चुकला असेल. मी माफी मागते. पण खरंच मला इथे खूप त्रास होत आहे”, असं सांगत ती ढसाढसा रडू लागली.
आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून एक्झिट गेल्यानंतर योगिताने इट्स मज्जा या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली आहे. यावेळी ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर आल्यानंतर कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती? असं योगिताला विचारण्यात आलं. तेव्हा योगिता म्हणाली, “गेले तीन वर्ष सौरभ आणि मी एकत्र आहोत. एवढे दिवस कधी लांब राहिलो नाही. शूटच्यानिमित्ताने लांब राहिलो आहे. पण बघणं नाही, बोलणं नाही, एकमेकांशी संपर्क नाही असं कधीच झालं नाही. घरातील मंडळी भावुक झाली. आई-बाबा, सौरभ, माझ्या घरातील मंडळी सगळेच खूश होते की, मी पुन्हा आली आहे. माझ्या घरच्यांनाही मी काल भेटले. सगळे खूश आहेत आणी मीही आनंदी आहे”.
तर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात बायकोला रडताना पाहून सौरभ ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “मी योगितापेक्षा दहा पटीने भावनिक आहे. मी माझ्या माणसांपासून फार काळ लांब राहू शकत नाही. माझे खूप मित्र-मैत्रिणी आहेत. ते सतत मला माझ्याबरोबर लागतात. हेही एक कारण आहे की, मी ‘बिग बॉस’मध्ये गेलो नाही. योगिताला रडताना पाहून माझी पहिली प्रतिक्रिया हिच होती की, आज पहिलाच दिवस आहे आता रडू नको”.