‘बिग बॉस मराठी’च्या घरातून छोटा पुढारी म्हणजेच घनःश्याम दरवडेचा प्रवास संपला. आपल्या बोलीने कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा घनःश्याम दरवडे कायमच चर्चेत राहिला. घरातील सदस्यांच्या वादामुळे तो चर्चेत राहिला. शिवाय रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर घेतलेल्या शाळेमुळेही छोटा पुढारी चर्चेत आलेला दिसला. रितेशने भाऊच्या धक्क्यावर घन:श्यामला एक टास्क दिला होता. यामध्ये विविध टॅग्ज घरातील अन्य सदस्यांना द्यायला सांगितले होते. यावेळी छोट्या पुढारीने माचिस म्हणजे धनंजय दादा आणि साप म्हणजे पॅडी दादा आहेत असं सांगितलं. याशिवाय अंकिताला घन:श्यामने खंजीर हे चिन्ह दिलं. यानंतर रितेशने “घन:श्यामला चावीचा माकड हे चिन्ह कोणाला देशील?” असं विचारलं यावर, “सर हे चिन्ह देणं अवघड आहे मी कोणालाच देऊ शकत नाही” असं सांगत घन:श्यामने या चिन्हाची उपमा कोणासही देण्यास नकार दर्शवला. घन:श्यामची ही कृती पाहून रितेश देशमुख चांगलाच भडकला. (Ghanshyam Darvade on riteish deshmukh)
या प्रकरणावर आता घरातून बाहेर पडताच घनःश्यामने भाष्य केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडल्यानंतर घनःश्यामने ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. यावेळी घनःश्यामला रितेश सर तुझ्याशी कमी बोलायचे का?, त्यांची काही नाराजी होती का?, असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत घनःश्याम म्हणाला, “पहिल्या दोन आठवड्यात ते बोलले आणि तिसऱ्या आठवड्यात रितेश सरांच आणि माझं वाजलं होतं. आणि ते वाजलं होतं हे चांगल्यासाठीच होतं हे मला कळलं. एक टास्क होता. समोर असलेल्या चिन्हांना स्पर्धकांची नाव द्यायची होती पण मी या टास्कमध्ये मैत्री जपली. चाकू, तुतारी, आगपेटी, माकड अशी चार चिन्ह द्यायची होती. तर मी म्हणालो मी नाही देणार. तर सर म्हणाले हा टास्क पूर्ण करावाच लागेल. मी म्हणालो सर मी मैत्रीसाठी काहीही करु शकतो. मी माझ्या मैत्रीला कधीच कलंक लावू शकणार नाही. मी माझ्या निर्णयापुढं जाऊ शकणार नाही असं मी स्पष्टपणे रितेश सरांना बोललो. सर तेव्हा म्हणाले, मग तुला बाहेर जावं लागेल. मी म्हणालो हो मी बाहेर जाईन पण मैत्रीला डाग लावून बाहेर जाणार नाही. तेव्हा मैत्रीमुळे थोडंसं वाजलं होतं. त्यानंतर ते बोलायला लागले, सरांसमोरच असं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की घनःश्याम दरवडेची मैत्री नेमकी काय आहे. मैत्री असेल तर मी कधीही माझ्या जवळच्या व्यक्तींच्या पाठीत खंजीर खुपसलं नाही. कधीच मतभेद केले नाहीत. अरबाज, जान्हवी, वैभव, निक्की यांच्या कायम पाठीशी राहिलो”.
एपिसोडमध्ये या टास्कदरम्यान रितेशने छोटा पुढारीची चांगलीच शाळा घेतली. रितेशने शेवटी “या चला संपलाय टास्क” असं सांगत त्याला जागेवर बसण्यास सांगितलं. यानंतर घन:श्याम म्हणाला, “सर, मी मनापासून तुमची माफी मागतो. यापुढे माझ्याकडून ही चूक कधीच होणार नाही. मला शिक्षा नका देऊ…मला घराबाहेर जायचं नाहीये.” रितेश यावर पुढे म्हणाला, “एकतर तुम्ही दिसत नाही म्हणून तुमच्यासाठी हा टास्क ठेवला. तुम्ही काहीतरी बोलावं, करावं हा उद्देश होता पण, त्यात सुद्धा तुम्हाला नाही करायचंय. घन:श्याम इथून पुढे होणार काहीच सांगू नका कारण, मी यापुढे तुमच्याशी बोलणारच नाहीये.”
रितेश भडकल्याचं पाहताच घन:श्याम त्याला “एक संधी द्या सर” असं म्हणत विनवणी करू लागला. पण, रितेश यावर म्हणाला, “तुम्हाला मी एक संधी देतो…आज तुम्हाला एलिमिनेट करणार नाही. पण, इथून पुढे माझ्याकडून काहीच अपेक्षा ठेऊ नका. आता शांत बसायचं. तुमचा टास्क, गेम इथेच संपलाय. याच्यापुढे नाटकं बंद आणि माझ्यासमोर तर अजिबात करायची नाही.” एवढंच नव्हे तर “याच्यावरचा क्लोझअप काढून टाका” असं देखील रितेश ‘बिग बॉस’च्या टीमला सांगतो.