Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात झालेला चौथ्या आठवड्यातील भाऊचा धक्का रंगतदार ठरला. यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर कलाकारांची रितेश देशमुखने चांगलीच शाळा घेतली. यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर दुर्गा या आगामी मालिकेची टीमही आली होती. या मालिकेतील रुमानी खरे, शिल्पा नवलकर, अंबर गणपुळे या तिघांनीही घरातल्या सदस्यांबरोबर एक खास टास्क खेळला. दुर्गाने यावेळी घरातील सदस्यांबरोबर रॅपिड फायर राऊंड घेत अनेक प्रश्न विचारत त्यांना संभ्रमात पाडलं. यावेळी अरबाजच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा झाला.
या रॅपिड फायरमध्ये दुर्गा अरबाजला प्रश्न विचारते. पहिला प्रश्न असतो, “या घरात तुम्हाला सर्वात जास्त काय महत्त्वाचं वाटतं? प्रेम की गेम?” यावर अरबाज उत्तर देतो की, “गेम कारण, प्रेम करुन बघितलं पण, ते गेमसारखंच वाटतंय त्यामुळे आता मला गेम महत्त्वाचा आहे”. यानंतर दुर्गा दुसरा प्रश्न विचारते, “सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडला आहे आणि याचं खरं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तुम्ही सिंगल आहात की कमिटेड?”, यावर अरबाज जराही वेळ न घालवता ‘कमिटेड’ असं उत्तर देतो.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून निक्की व अरबाज यांच्यामध्ये प्रेमाचे बंध फुलताना दिसले. निक्की व अरबाजमधील जवळीक पाहायला मिळत असतानाच अरबाजने रॅपिड फायरमध्ये वैयक्तिक आयुष्याबाबत केलेल्या विधानाने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. Splitsvilla 15 मध्ये असताना अरबाजचे नायराबरोबर कनेक्शन होते. मात्र हे नातं जास्त काळ टिकलं नाही. त्यानंतर अरबाजने त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमाची कबुली देत लिझा बिंद्राबरोबरच्या नात्याची कबुली दिली.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात अरबाज गेल्यानंतर लिझाने त्याच्यासाठी केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली. लिझाने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट करत, “माझ्याकडे कदाचित सर्व उत्तरे नसतील, परंतु मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभे राहण्याचे वचन देते आणि तुझ्याबरोबर सर्व आव्हानांना सामोरे जाण्याचे वचन देते. एकत्रितपणे आपण जग जिंकू शकतो”, असं म्हणत अरबाजला पाठिंबा दर्शविला आहे.