Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा शेवटचा आठवडा सुरु आहे. फिनाले वीकमध्ये आल्यानंतर आता स्पर्धकांमध्ये ग्रँड फायनालिस्ट बनण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यंदाच्या पाचव्या पर्वाची पहिली फायनालिस्ट निक्की तांबोळी ठरली आहे. निक्कीने सूरजवर मात करत बाजी मारलेली पाहायला मिळाली. दरम्यान आता ‘बिग बॉस’च्या घरातील दोन्ही टीममध्ये फूट पडली असून प्रत्येकजण स्वतंत्र खेळताना दिसत आहे. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात नुकत्याच झालेल्या स्पर्धकांच्या किंमतीच्या खेळात अभिजीतने दिलेल्या किंमती पाहून स्पर्धकांचा हिरमोड झाला. यावर अभिजीतला जाबही विचारलेला पाहायला मिळाला. या टास्कदरम्यान सूरजला दिलेली किंमत पाहून अंकिता व डीपी यांनी अभिजीतला जाब विचारला.
या टास्क दरम्यान अभिजीतने सूरजचा खेळ पाहता, त्याची मेहनत पाहता त्याला सहा लाख रुपयांची किंमत दिली. हे अंकिता व डीपीला खटकलं. यावर टीम बी मधील स्पर्धकांमध्ये फूट पडल्याचं दिसलं. त्यांच्यातील मैत्री संपली असून आता ते स्वतंत्र खेळ खेळताना दिसत आहेत. समोर आलेल्या प्रोमोमध्ये डीपी अभिजीतला विचारतो की, “घरातील वावर, सहभाग, निर्णय घेणे, स्ट्रॅटर्जी प्लॅन करणे, मुद्दे मांडणे, मुद्द्यांवर ठाम राहणे यामध्ये मी खरंच १ लाख रुपयांसाठी पात्र आहे का?”. तर अंकिता मध्ये म्हणते, “तर सूरज सहा लाख रुपयांसाठी पात्र आहे का?”. तेव्हा डीपी म्हणतो, “मी घरी जाणार आहे हे वाक्य बाजूला ठेव”.
यावर अभिजीत स्पष्टीकरण देत म्हटलं, “मी याला सहा लाख का दिले तर मला वाटलं त्याच्यात खूप बदल झाला आहे. त्याने पूर्ण जिद्दीने त्याचे १००% देऊन प्रत्येक टास्क दिला आहे. तुम्ही त्याला कितीही बोला की त्याला कळत नाही आहे पण त्यानेच सगळ्यात जास्त झेंडे आणले”. यावर अंकिता मध्ये बोलते की, “की तू त्याला त्या मुद्द्यांमध्ये बसवून दाखव”.
यावर अभिजीत अंकिताला ऐकवतो आणि म्हणतो, “तू इथून जा रे बाबा. आता मला यांच्याशी बोलू दे. तुझ्या पद्धतीने माझं उत्तर नको मागू. मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देत आहे तर ते ऐकून घे. आणि त्यात मी कुठे चुकीचा आहे हे मला सांग”.