कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यात चाहत्यांना अधिक रस असतो. इतकंच काय तर या मंडळींचं लग्न तर चर्चेचा विषय असतो. बरेच कलाकार आपल्या जोडीदाराविषयी मनसोक्त बोलतात. लग्न ठरलं की, सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी देतात. असंच काहीसं सरप्राइज ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरने चाहत्यांना दिलं आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या बायकोसह फोटो शेअर करत लग्न करत असल्याचं सांगितलं. आता अक्षय लग्नाच्या तयारीला लागला आहे. यादरम्यानचे बरेच व्हिडीओ तो युट्युबद्वारे शेअर करत आहे. आताही अक्षयने लग्नसंदर्भातील पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. (Marathi actor akshay kelkar wedding)
अक्षयने होणाऱ्या बायकोसह लग्नाची खरेदी केली. आता तो कोकणातल्या गावी पोहोचला आहे. दापोलीमध्ये अक्षयचं कुलदैवत आहे. विशेष म्हणजे शुभकार्य करत असताना त्याने पहिली देवाची भेट घेण्याचं ठरवलं. आईसह तो कुलदैवताला पहिली पत्रिका ठेवायला कोकणातल्या गावी गेला. तो म्हणाला, “लग्नाची पत्रिका पहिली देवाला ठेवली जाते. म्हणूनच आम्ही आमच्या कोकणातल्या गावी जात आहोत. तिथे धमाल-मस्ती करु. काही लोकांना लग्नाचं आमंत्रण देऊ”.
दापोलीला पोहोचल्यानंतर त्याने मंदिरात देवासमोर पत्रिका ठेवली. त्यानंतर इतरांना आमंत्रण देण्यास अक्षयने सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याची आईही त्याच्या व्लॉगमध्ये प्रत्येक गोष्ट सांगत होती. आईने काही भाग स्वतः शूट केला. रस्त्यामध्ये अक्षयने आईसह वडापाव खाण्याचा आनंदही लुटला. मे महिन्यातच अक्षय लग्न करणार आहे. त्यापूर्वीच्या संपूर्ण विधी तो पारंपरिक रित्या पूर्ण करत आहे.
अक्षय व त्याची होणारी पत्नी साधना यांच्या लग्नाची कुटुंबियही जोरदार तयारी करत आहेत. गेली काही वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर अक्षय व साधनाने आपलं नातं पुढे नेण्याचं ठरवलं. कुटुंबियांच्या सहमतीने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शिवाय याआधीही अक्षय बऱ्याचदा त्याच्या गर्लफ्रेंडबाबत बोलताना दिसला होता. आता अक्षयचं लग्न नक्की कधी?, कुठे असणार? हे काही दिवसांत समोर येईलच.