Bigg Boss Marathi Jahnavi Killekar And Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष गाजलं. कलाकार मंडळींसह यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हवा पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वाच्या विजेतेपदावर रील स्टार सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. त्यामुळे सूरज चव्हाणची चांगलीच हवा असलेली पहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यापासून सूरज चर्चेत राहिलेला दिसला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या सूरजने त्याच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर हे बळ संपादन केले. आणि यामुळेच गेले दोन ते तीन महिने संबंध महाराष्ट्र सूरजवर भरभरुन प्रेम करताना दिसत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात असताना सूरजला त्याच्या सहस्पर्धकांचा भरपूर पाठिंबा मिळाला. टीम बी बरोबर सूरजचं खास बॉण्डिंग पाहायला मिळालं. डीपी, अंकिता, पॅडी, अभिजीत यांनी सूरजला भरपूर सांभाळून घेतलं. इतकंच नव्हे तर त्याला माहित नसणाऱ्या गोष्टी शिकवल्या. शोमध्ये टास्क समजून सांगण्यात यांचा खारीचा वाटा आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सूरजने अनेक बहिणी जमवल्या. यापैकीचं एक बहीण म्हणजे जान्हवी किल्लेकर.
‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातील जान्हवी व सूरज यांच्यात अनेक खटके उडालेले पाहायला मिळाले. मात्र, कालांतराने या दोघांच्या वादाचं रुपांतर भावा-बहिणीच्या सुंदर अशा नात्यात झालं. ‘बिग बॉस’ संपल्यानंतरही जान्हवीने बारामती गाठत सूरज चव्हाणची भेट घेतलेली पाहायला मिळाली. सूरजच्या गावी जात जान्हवीने त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवला. जान्हवीला पाहून सूरजही खूप खुश दिसला आणि त्याने तिला पाहताच घट्ट अशी मिठी मारलेली पाहायला मिळाली.
दिवाळीनिमित्त जान्हवीने सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये जान्हवीने स्वतःलाच ‘बिग बॉस’चं चिन्ह असलेलं ब्रेसलेट गिफ्ट केलं. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या तिच्या व्हिडीओवर चाहत्याने कमेंट करत, “सूरजला भाऊबीजेला ओवाळणी करायला गेली नाहीस का?”, असा सवाल केला आहे. यावर जान्हवीने “जाणार आहे” असं उत्तर दिलं आहे. आता जान्हवी आपल्या या मानलेल्या भावाची भाऊबीजेसाठी भेट केव्हा घेणार याचा व्हिडीओ पाहायला दोघांचेही चाहते उत्सुक आहेत.