मनोरंजन सृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांचे ३ नोव्हेंबर, रविवार रोजी निधन झाले. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘मर्द’मध्ये दिसलेली अभिनेत्री हेलेना गेली अनेक वर्षे अमेरिकेत राहत होती, जिथे तिने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी एका पोस्टद्वारे शेअर केली आहे. काही वृत्तानुसार, ६८ वर्षीय अभिनेत्री हेलेना ल्यूक गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. तरीही तिने डॉक्टरांकडे जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. (Mithun Chakraborty’s first wife passed away)
अभिनेत्री हेलेना ल्यूक या ७० च्या दशकात फॅशन जगतात एक प्रसिद्ध नाव होते. १९७९ मध्ये त्यांची मिथुन चक्रवर्तींबरोबर भेट झाली आणि काही काळ दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर दोघांनी लग्न केले. हेलेना व मिथुन यांचे १९७९ मध्ये लग्न झाले, तेव्हा मिथुन हे मोठे स्टार नव्हते. मिथुन व हेलेना यांचे लग्न होताच काही आठवड्यांनी त्यांच्यात भांडणे व्हायला सुरुवात झाली. त्यांतर लग्नाच्या ४ महिन्यांनंतर हेलेनाने मिथुनपासून घटस्फोट मागितला. स्टारडस्ट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत हेलेनाने तिचे लग्न तुटण्याचे कारण सांगितले होते. त्यांचे लग्न तुटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मिथुनची योगिता बालीशी जवळीक वाढू लागली होती. दुसरीकडे मिथुन हेलेनाला तिचा एक्स बॉयफ्रेंड जावेद खानबद्दल टोमणा मारत असे.
मिथुन चक्रवर्तीपासून घटस्फोट घेतल्यानंतर हेलेनाने चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावले. १९८० मध्ये आलेल्या ‘जुदाई’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्या अमिताभबरोबर ‘मर्द’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ब्रिटीश राणीची भूमिका केल्याबद्दल तिचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय अभिनेत्री ‘दो गुलाब’, ‘एक नया रिश्ता’, ‘साथ साथ’ आणि ‘आओ प्यार करें’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
आणखी वाचा – प्रसिद्ध दिग्दर्शकाचा धक्कादायक मृत्यू, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, नेमकं काय झालं?
दरम्यान, कालांतराने ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा हेलेना यांना हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळणे बंद झाले तेव्हा त्या अमेरिकेला गेल्या. अमेरिकेत राहून तिने डेल्टा एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करायला सुरुवात केली. अशातच आता अभिनेत्रीचे निधन झाले आहे.