Majjacha Adda with Pushkar Jog : मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा छाप पडणारा अभिनेता म्हणजे पुष्कर जोग होय. आपल्या हटके भूमिकांमुळे पुष्करने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. ‘जबरदस्त’, ‘धूम २ धमाल’, सत्य, सासूचं स्वयंवर अशा मराठी चित्रपटांसह ‘जाना पहेचाना’, ‘इएमआय’ अशा हिंदी चित्रपटांमधून पुष्करने मराठीसह हिंदी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनेता सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अनेक विषयांवर भाष्य करत असतो.
पुष्कर हा जितका चांगला अभिनेता आहे, तितकाच तो एक चांगला नवरा व वडीलही आहे. त्याच्या लेकीबरोबर त्याचा खास बॉण्ड आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात ‘बिग बॉस मराठी’मधील सहस्पर्धक सई लोकूरमुळे पुष्कर-व पत्नी जास्मिनच्या नात्यात वितुष्ट आल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र यावर स्वत: अभिनेत्याने आता भाष्य केले आहे. ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या खास मुलाखतीच्या कार्यक्रमात पुष्करने त्याच्या व पत्नीच्या नात्यावर भाष्य केले आहे.
आणखी वाचा – रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’मध्ये दिग्गजांसह मराठी कलाकारांची फौज, ट्रेलर पाहून कौतुकाचा वर्षाव
पुष्करने त्याच्या बायकोला सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. यावरून त्याला “तू तुझ्या बायकोला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. यावरुन बऱ्याच चर्चा रंगल्या. तर यामागचं नेमकं खरं कारण काय?” असा प्रश्न विचारण्यात आला. याबाबत स्पष्ट उत्तर देत पुष्कर असं म्हणाला की, “तिला सोशल मीडियाचा कंटाळा आला आहे. ती तिच्या आयुष्यामध्ये व्यग्र आहे. ती एका एअर कंपनीसाठी फ्लाय करते. मी माझ्या कामामध्ये व्यग्र आहे. आमच्या दोघांसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आमची मुलगी आहे. तिचं पुढचं भविष्य हे इन्स्टाग्रामपेक्षा आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की, फेसबुक, इन्स्टाग्रामला आपण इतकं महत्त्व देऊ नये. शिवाय, यामुळे काहीतरी अडचण आहे असंही समजू नये. कुठे अडचणी येत नाहीत. इंडस्ट्रीमध्ये तसेच आयुष्यातही अडचणी येतात. तुम्ही प्रत्येक प्रसंगाला कसं सामोरे जाता हे महत्त्वाचं आहे. माझी मुलगी माझं आयुष्य आहे. तिने माझं आयुष्यही बदललं आहे. फॉलो-अनफॉलोला इतकं महत्त्व आम्ही देत नाही”.
दरम्यान, पुष्कर आता आगामी ‘मुसाफिरा’ या चिटपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. येत्या २ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.