छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री उर्वशी ढोलकियाचं नाव टॉपला आहे. तिने आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. शिवाय अलिकडेच ‘झलक दिखला जा ११’ डान्स शोमध्ये ती सहभागी झाली होती. आता तिच्याबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. उर्वशीला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आहे. उर्वशीचा मुलगा क्षितिजने सोशल मीडियाद्वारे रुग्णालयामधील व्हिडीओ व आईचा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. शिवाय उर्वशीनेही तिच्या आजाराबाबत खुलासा केला आहे. (Actress Urvashi Dholakia Hospitalized)
उर्वशीचा रुग्णालयामधील बेडवरचा फोटो पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. उर्वशीला मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आहे. पण तिला नेमका कोणता आजार झाला आहे हे उर्वशीने सांगितलं. उर्वशी म्हणाली, “डिसेंबर २०२३मध्ये माझ्या मानेमध्ये ट्युमर असल्याचं निदान झालं. ट्युमरमुळे माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आता १५ ते २० दिवस मला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे”. फोटोमध्ये उर्वशीचा संपूर्ण लूक बदललेला दिसत आहे. तसेच तिची प्रकृती पाहता चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
उर्वशीचा मुलगी क्षितीज तिची काळजी घेत आहे. त्याने आईचा रुग्णालयातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये “लवकर बरी हो” असं त्याने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये त्याने रुग्णालय दाखवलं आहे. एखाद्या हॉटेलसारखं रुग्णालय असल्याचं क्षितीजने म्हटलं आहे. सध्या उर्वशीवर रुग्णालयामध्ये योग्य ते उपचार सुरु आहेत.
उर्वशीने आतापर्यंत तिच्या आजाराबाबत बोलणं टाळलं होतं. काही दिवसांपूर्वीच ती ‘झलक दिखला जा ११’या शोमधून बाहेर पडली होती. पण तेव्हाही तिने तिच्या आजाराबाबत गुप्ताता पाळली. आता तिच्या प्रकृतीविषयी कळाल्यानंतर चाहते चिंतेत आहेत. तसेच उर्वशीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.