बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी हे त्यांच्या ‘कॉप यूनिवर्स’ या चित्रपटांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. लवकरच या सीरिजमधील आणखी एक सीरिज ‘इंडियन पुलिस फोर्स’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला असून या सीरिजमधील कलाकारांच्या विविध लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. अशातच नुकताच या सीरिजचा ट्रेलरही चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून अल्पावधीतच हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Indian Police Force Trailer)
‘इंडियन पुलिस फोर्स’ या सीरिजच्या माध्यमातून रोहित शेट्टी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत. त्याच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेबससीरिजमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा व विवेक ओबेरॉय हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्याचबरोबर वैदही परशुरामी, सूचित्रा बांदेकर व शरद केळकर यांसारख्या मराठी कलाकारांचीदेखील या सीरिजमध्ये वर्णी लागली आहे. रोहित यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या सीरिजचा ट्रेलर शेअर केला आहे.
‘इंडियन पोलीस फोर्स’ ही सीरिज दिल्लीमधील ३ पोलिसांची गोष्ट आहे. या पोलिसांचा सामना शक्तीशाली गुडांशी होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या ट्रेलरमध्ये शिल्पा शेट्टीही अॅक्शन करताना पाहायला मिळत आहे. रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’, ‘सिंबा’ या चित्रपटांप्रमाणे अॅक्शन पाहायला मिळाली होती. त्यामुळे साहजिकच या सीरिजमध्येही चाहत्यांना खूप अॅक्शन पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही सीरिज येत्या जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय जगभरातील इतर देशातही याचदिवशी ही वेबसिरिज प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमॅझॉन प्राईमवर ही सिरिज पाहाता येणार आहे. त्यामुळे रोहित शेट्टीसह सीरिजमधील अनेक कलाकारांचे चाहते या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत हे नक्की.