Itsmajja Original Paus Series : पाऊस आणि प्रेम हे सारखंच असतं! पावसात भिजताना मनात जो आनंद असतो, चेह-यावर जे समाधान असतं ते शब्दात व्यक्त करणं अवघड आहे. तसंच आपण प्रेमात पडतो तेव्हा अनेकांना जग जिंकले आहे असा आनंद होतो. आपण प्रेम करतो ती व्यक्ती दिसली नाही, तिची भेट झाली नाही की, जी हुरहूर लागते तशीच हुरहूर पावसाच्या अनिश्चिततेत असते. प्रेमात ओढ असते, प्रेमात सर्व काही पणाला लावण्याची जिद्द असते, तयारी असते. अगदी तशीच ओढ व जिद्द ही प्रेमातही असते. ‘पाऊस’ हा कायमच प्रत्येकासाठी स्पेशल असतो. पावसाबरोबरच्या अनेकांच्या आठवणी या अविस्मरणीय असतात आणि या आठवणी बेभान करणार्या असतात. आता तुम्ही म्हणाल पाऊस आणि प्रेम याबद्दल आता व्यक्त होण्याचे कारण काय? तर याचं कारण म्हणजे ‘इट्स मज्जा’ची आगामी सीरिज ‘पाऊस’. (Itsmajja Series Paus Trailer)
‘मीडिया वन सोल्युशन्स’ व ‘इट्स मज्जा’ हे कायमच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ‘इट्स मज्जा’ने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आहे आणि त्यामुळेच ‘इट्स मज्जा’ कायमच मनोरंजक कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. अशातच ‘इट्स मज्जा’ ‘पाऊस’ या नवीन सीरिजमधून एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येत आहे. पाऊस आणि प्रेमाचं नात हे प्रत्येकाला भावणारं आहे. प्रत्येकाच्या प्रेमकहाणीमध्ये कुठे ना कुठेतरी पाऊस हा महत्वाचा असतो. याच पाऊसाचं आणि प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणारी नवीन वेबसीरिज आपल्या भेटीला येत आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि या ट्रेलरमधून पाऊस, प्रेम व प्रेम करणारी दोन माणसं पाहायला मिळत आहे.
‘पाऊस’ वेबसीरिजचे निर्माते शौरिन दत्ता म्हणाले, “सर्वप्रथम ‘आठवी अ’ वेबसीरिजला दिलेल्या प्रतिसादाबाबत सगळ्या प्रेक्षकांचे आभार. प्रेक्षकांचा ओटीटीकडे वाढता कल पाहता एक वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांसमोर आणण्याचं ठरलं. त्यानुसार संपूर्ण टीमच्या प्रयत्नांमधून ‘पाऊस’ वेबसीरिजचा जन्म झाला. ही सीरिज प्रेमाची व्याख्या अगदी अनोख्या पद्धतीने अधोरेखित करणारी आहे. गाव व शहरात राहणाऱ्या माणसांची जीवनशैलीचंही दर्शन घडवणारी ही कथा आहे. सगळ्याच कलाकारांनीही अगदी उत्तम काम केलं आहे. ‘आठवी अ’ प्रमाणेच ‘पाऊस’ वेबसीरिजला तुम्ही भरभरुन प्रतिसाद द्याल अशी आशा आहे”.
‘पाऊस’ या वेबसीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे म्हणाल्या की, “पाऊस या वेबसीरिजमधून प्रेक्षकांना एक वेगळी प्रेमकथा अनुभवायला मिळणार आहे. शिवाय गावच्या मातीतील रांगडेपणा विशेष लक्ष वेधून घेणारा आहे. या वेबसीरिजमधील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका अगदी चोखपणे पार पाडली आहे. ही सीरिज बघत असतान तुमच्याही ते लक्षात येईल. ‘पाऊस’चं चित्रीकरणही साताऱ्यासारख्या भागात अगदी निसर्गरम्य वातावरणात पार पडलं. त्यामुळे साताऱ्याचं निसर्गसौंदर्य यामध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. ‘आठवी-अ’ वेबसीरिजच्या भरघोस यशानंतर ‘पाऊस’ वरही तुम्ही तितकंच प्रेम कराल याची खात्री आहे”.
दरम्यान, या नवीन सीरिजमध्ये मुख्य अभिनेत्री आरती बिराजदार आहे तर मुख्य अभिनेता अक्षय खैरे आहे. ‘पाऊस’ची कथा व दिग्दर्शन हे ‘आठवी-अ’च्या नितीन पवार यांचे असून या नवीन सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी स्वीकारली आहे. तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे आहेत. प्रेम, पाऊस आणि या दोघांमधला गोडवा व दुरावा या सीरिजमधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि हा अनुभव म्हणजेच ही सीरिज येत्या १९ ऑगस्टपासून तुम्हाला ‘इट्स मज्जा’ या युट्यूब वाहिनीवर पाहता येणार आहे.