Saade Made Teen : झी टॉकिज स्टुडिओचा पहिला मराठी चित्रपट म्हणजे ‘साडे माडे तीन’. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हास्य, विनोद, भावनिक सीन्स अशा सर्व गोष्टींनी भरलेला हा चित्रपट सुपरहिट झालेला. आजही केव्हा टीव्हीवर हा चित्रपट लागला तर तो आवर्जून पाहिला जातो. हा चित्रपट २००७मध्ये प्रदर्शित झाला होता. अंकूश चौधरी आणि सचित पाटील यांनी अभिनेत्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. भरत जाधव, मकरंद अनासपुरे व अशोक सराफ ही कुरळे ब्रदर्सची तिकडी सगळ्यांनाच भावली होती. अशातच १७ वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही त्रयी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा दूसरा भाग येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी करणार आहे. (Saade Made Teen Sequel)
‘साडे माडे तीन’ हा चित्रपट हिंदीत गाजलेल्या ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटाचा रिमेक होता. ‘साडे माडे तीन’ हा चित्रपट त्या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक होता. अशातच आता या चित्रपटाचा दूसरा भाग म्हणजेच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाची सोशल मीडियाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे कलाकारच प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहेत. येत्या सप्टेंबरपासून ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ होणार आहे.
या चित्रपटाबद्दल अंकुशने असं म्हटलं आहे की, “पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येणे, हे खरंच खूप जबाबदारीचं काम असतं. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. या भागात कुरळे ब्रदर्सची धमाल डबल झालेली असेल. यात ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. मी जरी या सिनेमाचा दिग्दर्शक असलो, तरी हा केवळ माझ्या एकट्याचा सिनेमाचा नसून तो अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव या एकत्र टीमचा आहे”.
दरम्यान, याच चित्रपटाच्या सिक्वेलवर अंकुश सध्या काम करत असून ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे ‘साडे माडे तीन’मधील कलाकारच प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. बाकी कलाकारांबद्दल अद्याप माहिती मिळाली नसली तरी या चित्रपटासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत हे नक्की.