‘बिग बॉस मराठी ५’ च्या विजेतेपदावर गोलीगत सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं आणि आता तो सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. सूरज गरीब घरातून आला असून टिक टॉक वरील व्हिडीओमुळे तो खूप व्हायरल झाला होता. ‘बिग बॉस’च्या घरातही तो गावाकडच्या आठवणी सांगायचा. ट्रॉफी मिळाली तर आधी जेजुरीला जाणार असं तो म्हणाला होता. त्याप्रमाणे सूरजने ट्रॉफी घेत जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. तसंच नंतर गावी पोहोचल्यावर त्याचं लोकांनी जोरदार स्वागत केलं आणि त्याच्या या स्वागताचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan)
सूरज चव्हाणची हा मूळचा बारामतीमधील मोढवे गावातला आहे. ‘बिग बॉस’चं विजेतेपद पटकावल्यानंतर त्याचं गावी जंगी स्वागत झालं. एकदम झापूक झुपूक स्टाईलमध्ये त्याने गावात एन्ट्री घेतली आणि बिग बॉसची ट्रॉफी अभिमानाने मिरवत त्याने गावकऱ्यांचा पाहुणचार घेतला. यावेळी मोढवे गावकऱ्यांनीही डीजे लावून, गुलाल उधळून सूरजची विजयी मिरवणूक काढली. यावेळी गावात बेफाम नाचणारा सूरज गाडीच्या रुफमधून बाहेर येत सर्वांना अभिवादन करताना दिसला. यावेळी सूरजला पाहण्यासाठी ग्रामस्थांचा जनसागर लोटला होता. लाखोंच्या संख्येने गावकरी त्याला पाहण्यासाठी आले होते.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरला होणाऱ्या नवऱ्याने दिलं मोठं सरप्राइज, फोटो पोस्ट करत म्हणाली, “नवऱ्या…”
सूरज मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन त्याच्या गावी रवाना झाला. सूरजच्या गावी त्याचे स्वागत होत असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गावात त्याची विजयी मिरवणूक काढण्यात आली. झापुक झुपूक करणाऱ्या सूरजला अनेक दिवसांनी गावी परतताना पाहून त्याचे चाहते देखील आनंदी झाले होते. सूरजबरोबर फोटो काढण्यासाठी संपूर्ण गावात मोठी गर्दी झाली होती.
आणखी वाचा – नवरात्रीच्या सातव्या दिवशी शुभन योगामुळे धनू राशीला आर्थिक लाभ, मकर राशीच्या लोकांना व्यवसायात मिळणार यश
दरम्यान, बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणने एन्ट्री घेतली होती तेव्हा अनेकांनी त्याच्याबद्दल नाकं मुरडली होती. त्याच्या ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवेशावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र सूरजने आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने आणि वागणूकीने अनेकांची मनं जिंकली. त्यामुळे अनेकांचा नावडता सूरज आता सर्वांचाच आवडता झाला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.