‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व आता संपून जवळपास दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. पण तरीही या शोबद्दल आणि या शोमधी स्पर्धकांची चर्चा काही कमी झालेली नाही. या शोमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि यापैकी सर्वांचीच सोशल मीडियावर चर्चा होताना पाहायला मिळते. यापैकी सर्वाधिक चर्चेत येणारे नाव म्हणजे रीलस्टार सूरज चव्हाण. ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच अनेकांनी नाकं मुरडली होती. पण या घरात त्याने आपल्या वागणुकीने सर्वांची मनं जिंकली. चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे सुरजने ‘बिग बॉस’चे विजेतेपदही पटकावले. या घरातील खेळ त्याला समजला नसला तरी बाहेरच्या जगातील अनुभवाने इथल्या प्रत्येक माणसाचे मन जिंकले. आणि तो या शोचा विजेताही झाला. (Suraj Chavan Mother Injured)
सूरज चव्हाण ‘बिग बॉस’च्या विजेता झाल्यानंतर त्याच्यावर अवघ्या महाराष्ट्रातून प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. विजेता झाल्याच्या दोन आठवड्यांनीसुद्धा त्याच्या कौतुकात भर पडत आहे. विजयानिमित्त तो ठिकठिकाणी भेटी देत आहे. अशातच त्याने नुकताच ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’वर हजेरी लावली होती. यावेळी मुलाखतीत त्याने आईला त्याच्याकडून चुकून झालेल्या इजेबद्दलची भावना व्यक्त केली. आईच्या पायवार चुकून त्याच्याकडून पाटा पडला होता. यामुळे त्याला खूप वाईट वाटले असल्याचे त्याने म्हटलं.
याबद्दल सुरज चव्हाणने असं सांगितलं की, “मला वाईट कधी वाटलं, जेव्हा माझ्याकडून चुकून माझ्या आईच्या पायावर पाटा पडला तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तेव्हा मला खूप रडू आले आणि माझं मन तेव्हा खूप भरुन आलं. तेव्हा काय करावं आणि काय नको असं वाटत होतं. स्वत:लाच मारावं असंही वाटत होतं. आईची माया म्हणजे… काळीज फाटलं, हृदय तुटलं, मरीआईचं नाव घेतलं तेव्हा खूप बरं वाटलं. तशी माझी आई होती. खूप वाईट वाटलं पण आता काय करणार… देवाने माझं कोण जवळचं ठेवलं नाही. आजोबा गेले, आजी गेली, आप्पा गेले, आई गेली, चुलता गेला. त्यामुळे मला कुटुंबच नाही. मला घरातलं कोणीच नाही”.
दरम्यान, सूरज चव्हाण हा मूळचा बारामतीचा आहे. बारामतीमधील मोढवे गाव येथे तो वास्तव्यास आहे. सूरज चव्हाण हा आता लोकप्रिय आणि प्रसिद्धीच्या झोतात आला असला तरी त्याचं वैयक्तिक आयुष्य खूप खडतर राहिलं आहे. सूरजचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. तो लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं होतं. त्याची घरातील परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला इयत्ता आठवीपर्यंतच शिक्षण घेता आलं होतं. सूरजला पाच बहिणी आहेत. यांपैकी मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.