Khushboo Tawde Baby Shower : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे खुशबू तावडे व संग्राम साळवी ही जोडी. प्रेक्षकांची लाडकी जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे. ही आनंदाची बातमी नुकतीच खुशबूने सोशल मीडियावरून जाहीर केली. ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’मधून खुशबूने एक्झिट घेतली. यावेळीच खुशबू दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं समोर आलं होतं. तसंच खुशबूने तिच्या गरोदरपणाबद्दलचा एक व्हिडीओही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला होता. “थोडंसं आणखीन प्रेम आमच्या कुटुंबात सामिल होतं आहे”, असं कॅप्शन देत खुशबूने नवरा संग्राम व मुलगा राघव यांच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर केला होता. (Khushboo Tawde Baby Shower News)
अशातच अभिनेत्रीचं डोहळ जेवणदेखील पार पडलं आहे. जुलै महिन्यात खुशबूचं डोहाळे जेवण पार पडलं. याचा व्हिडीओ नुकताच खुशबूची बहीण अभिनेत्री तितीक्षा तावडेने शेअर केला आहे. तितीक्षाने तिच्या युट्यूब चॅनलवर खुशबूच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची खास झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. तितीक्षाच्या घरी हे डोहाळ जेवण पार पडल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. घरीच साध्या पद्धतीने आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत खुशबूचं हे दुसरं डोहाळे जेवण पार पडलं. यावेळी खुशबूचे सर्व आवडते पदार्थ आणि तिला पहिल्या गरोदरपणात ज्या पदार्थाचे डोहाळे लागले होते. ते सर्व पदार्थ दुसऱ्या डोहाळे जेवणात ठेवण्यात आल्याचं तितीक्षाने या व्हिडीओमधून सांगितलं.
खुशबूच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात तितीक्षा व सिद्धार्थ बोडके आपल्या कुटुंबाबरोबर खुशबूच्या डोहाळे जेवणाची तयारी करताना दिसत आहेत. यानंतर त्यांनी खुशबूच्या डोहाळे जेवणाचा मुख्य कार्यक्रम केला. यावेळी मुलगा की मुलगी हे ओळखायचा खेळ घेतला. तेव्हा खुशबूने पेढ्याची वाटी उघडली. आता यावरून खुशबू पुन्हा एकदा गोंडस चिमुकल्याला जन्म देणार का? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. मात्र खुशबूच्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला पती संग्राम साळवी दिसला नाही. कारण ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील चित्रीकरणाचा संग्रामचा पहिला दिवस होता. त्यामुळे त्याने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून खुशबूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
आणखी वाचा – “बाबा तुमची आठवण येतेय”, विलासराव देशमुखांच्या स्मृतीदिनानिमित्त रितेश-जिनिलीया भावुक, फोटोही केले शेअर
दरम्यान, २०१८ मध्ये खुशबू व संग्रामचं लग्न झालं. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२१ रोजी दोघं पहिल्यांदाच आई-बाबा झाले. लग्नानंतर अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला; ज्याचं नाव राघव आहे. खुशबू व संग्रामचा पहिला मुलगा राघव आता ३ वर्षांचा आहे. अशातच आता साळवी कुटुंबात आणखी एका पाहुण्याचं आगमन होणार आहे. गरोदर असल्यामुळे खुशबूने ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका काही दिवसांपूर्वी सोडली. यावेळी मालिकेतील कलाकारांनी तिचा शेवटचा दिवस साजरा केला. केक कापून आणि भेटवस्तू देऊन मालिकेच्या सर्व टीमने खुशबूला निरोप दिला.