सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर आज करण्यात आले आहेत. सन २०२४च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आलं असून सर्व पुरस्कारार्थींचे सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे. चित्रपट सृष्टीतील विशेष योगदानाबद्दल अनेक दिग्गज मंडळींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही मानाच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. (Digpal Lanjekar and Shivaji satam awarded)
ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३ जाहीर झाला असून ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात येईल. याशिवाय चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३ साठी दिग्पाल लांजेकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३ साठी एन. चंद्रा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

सुधीर मुनगंटीवार यांनी लिहिले की, “चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहीर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, ज्येष्ठ अभिनेते श्री. शिवाजी साटम यांना आणि स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर करत आहोत. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३, लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता श्री. दिग्पाल लांजेकर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३, ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन.चंद्रा यांना जाहीर करत आहोत”.
त्यांनी पुढे असे म्हटले की, “या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार्दिक अभिनंदन! राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य व उदंड यश द्यावे या शुभेच्छा”, अशी पोस्ट त्यांनी त्यांच्या एक्स या अकाउंटवरुन दिली आहे. मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शक, लेखक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेते शिवाजी साटम यांचे नाव येताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.