Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा नवीन सीझन सुरु होऊन आता पाच आठवडे झाले आहेत. गेल्या महिनाभरात या घरात अनेक घटना घडल्या असून या खेळातील रंजकता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. घरातील स्पर्धकांमधली खेळाडूवृत्ती अनुभवण्यासाठी बिग बॉसही नवनवीन टास्क घेऊन येत असतात अशातच आता बिग बॉसने सर्वांना एक नवीन टास्क दिला आहे, ज्याचं नाव आहे बीबी फार्म. या नवीन टास्कमध्ये सर्वांना ‘बिग बॉस फार्म’चा कारभार सांभाळावा लागणार आहे. या टास्कच्या प्रोमोमध्ये सदस्य बीबी फार्मचा कारभार सांभाळताना दिसणार असून त्यांच्यात टास्कदरम्यान होणारी झटापटही प्रेक्षकांना या टास्कमधून पाहायला मिळणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या टास्कच्या या प्रोमोमध्ये घरातील सदस्य बीबी फार्मचा कारभार सांभाळताना दिसत आहेत. वैभव, अरबाज, सूरज, जान्हवी, घन:श्याम, निक्की, आर्यासह अनेक सदस्य आक्रमकपणे टास्क खेळत आहे. त्यांचा आक्रमकपणा पाहून ‘बिग बॉस’ सदस्यांना चांगलीच शिक्षा सुनावणार आहेत. प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत, “आक्रमकतेची शिक्षा म्हणून दोन्ही टीममधील एका सदस्याला बाद करण्यात येत आहे”.
आता हा नवीन बीबी टास्क काय आहे? यात स्पर्धकांना नेमकं काय करायचं आहे? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात खेळादरम्यान, सूरज हा खूपच आक्रमक झाल्याचे या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. गेल्या आठडव्यात सूरजचा गेम फारसा दिसून आला नव्हता. त्यामुळे आता या आठवड्यात तो त्याचा गेम कसा खेळणार? तसंच ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या टास्कमधून दोन्ही टीममधले कोणते सदस्य बाद होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण सदस्य बीबी फार्मचा कारभार सांभाळताना पाहून प्रेक्षकांचं मात्र चांगलंच मनोरंजन होणार आहे.
दरम्यान, सोमवारच्या नॉमिनेशन टास्कमध्ये या घरातून एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ‘ आता यापैकी कोणता सदस्य आपला खेळ उत्तम खेळून स्वत:ला सुरक्षित करणार? तसंच बिग बॉसच्या नवीन टास्कनध्ये कोण कुणाला किती भारी पडणार? हे प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.