Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या आठवड्याचा भाऊचा धक्का चांगलाच गाजला. या भाऊचा धक्क्यावर रितेशने आठवडाभरात सर्व स्पर्धकांनी केलेल्या चुकीबद्दल शाळा घेतली. तसंच उत्तम कामगिरी करणाऱ्यांचे कौतूकही केलं. गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना अरबाजचं रौद्ररुप पाहायला मिळालं होतं. निक्कीशी भांडण करून त्याने घरातील सामानाची तोडफोड केली होती. याबद्दल त्याला रितेशने खडेबोल सुनावले. एवढंच नव्हे तर आर्याची सुद्धा शाळा घेण्यात आली. तसंच अंकितालादेखील तिच्या खेळीबद्दल ओरडा पडला. रितेशने इतर सगळ्या सदस्यांना झापून निक्कीची बाजू घेतल्याने प्रेक्षकांना भाऊच्या धक्क्यावर नाराजी व्यक्त केली आहे. (Vishakha Subhedar On Bigg Boss Marathi 5)
निक्की आतापर्यंत अत्यंत चुकीची खेळत होती. त्यामुळे तिचं एवढं कौतुक करण्याची काहीच गरज नव्हती असा दावा असंख्य नेटकऱ्यांनी केला आहे. मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारसुद्धा या कार्यक्रमात घडणाऱ्या विविध प्रसंगांवर व्यक्त होत असतात. अशातच मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनीही कालच्या भागाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. नुकताच झालेला भाऊचा धक्का आणि निक्कीचा अनसीन अनदेखामधील एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि निक्कीवर संताप व्यक्त केला आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत विशाखा यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
या पोस्टमध्ये विशाखा यांनी असं म्हटलं आहे की, “काल निक्की सोडून सगळेच चुकले… जे जे दिसलं त्यात सगळेच चुकीचे दिसलें अरबाजने प्यादं केलं उरलेल्या लोकांचं. मान्य आहे चुकलंच! त्याच्यावर (अरबाज+निक्की) तुमचा गेम नकोच असायला. अरबाज आणि निक्की त्यांची त्यांची खेळी खेळत आहेत तुम्ही तुमचं खेळा.! आत्ता धक्का… बी टीमलाच आणि आम्हा प्रेक्षकांनासुद्धा. निक्कीने डबा फोडला. तिच्या ट्रॉमामुळे ती अंधारात गेली नाही, हा तिचा गेम होता. मग अभिजीतला त्याक्षणी ‘टीम बी’ने सपोर्ट न करणं हा त्यांचा गेम असू शकत नाही? जेणेकरून निक्कीला आत जावच लागेल. स्वतंत्र खेळ आणि टीम स्पिरीटचा खेळ आहे. त्यामुळे एकत्र निर्णय घेतला. नियम असूनही ती सपोर्ट करीत नाही तिला काहीच बोललं गेलं नाही? आणि ऑपशन का दिला गेला? नियम म्हणून घरभर फिरायचं आणि टास्क करताना दुसरा गडी वापरायचं? फक्त बी टीमला का धारेवर धरलं जात?”
यापुढे अभिनेत्रीने असं म्हटलं आहे की, “आत्ता जरा निक्की बद्दल.. या बाई, निक्कीची चिक्की म्हणजे वाइल्ड कार्ड एन्ट्री. ही घरुनचं ठरवून आलीय, बिग बॉसने घरात न घरात तिच्यासाठी हॅंड्सम मुलगा आणायचा आणि ती प्रेमाचे रंग उधळणार. मग त्याच्या बळाचा ही मुलगी फायदा घेणार आणि आपण प्रेक्षक हे चाळे पाहणार! अरे हे काय आहे? किती स्वार्थी असावं? अप्पलपोटी, ढालगज आणि तिचं हे ज्ञान अभिजीत निमूट ऐकन कसं घेतो. ही निक्कीची रणनीती? याआधी हे एकमेकांत गुंतणं आम्ही पाहिलंय. (पण ते ठरवून नाही वाटलं नंतर नंतर ते कळलंच) पण हे रागावणं खरं खोटं देवास ठाऊक. आणि बाईच्या मिठीत स्वर्ग सारा हे सांगणारा प्रवचन या सीझनमध्येच ऐकला आणि पाहिला”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “अरबाज-वैभव भिडले नाहीत. तशी निक्की आणि जान्हवी पण भिडले नाहीत. ती निक्की तर घाबरते जान्हवीला असं मला वाटतं. कारण ती तिच्यासमोर उतरत नाही तिला उलट बोलत नाही आणि वैभव पण घाबरतो अरबाज ला!” दरम्यान, या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे.