काही अभिनेते आपल्या छोट्या भूमिकेतूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. चित्रपटातील भूमिका छोटी असली तरी त्यात जीव ओतून काम केल्यामुळे हे अभिनेते अनेक काळ प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. असाच छोट्यातील छोटी भूमिकाही प्रामाणिकपणे साकारुन हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा अभिनेता म्हणजे अमेय हुनसवाडकर. ‘पछाडलेला’ हा चित्रपटातून अमेयच्या करिअरला ख-या अर्थाने कलाटणी मिळाली. त्यानंतर अमेयची हिंदी-मराठीतील प्रत्येक भूमिका गाजली. जाहिराती, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांतून त्याने प्रेक्षकांच्या समोर नेहमी वेगळा अमेय आणला. फक्त विनोदी भूमिका न करता प्रेक्षकांना वेगळे काहीतरी देण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. भूमिका कोणतीही असो, पण अमेय पडद्यावर दिसल्यावर तो नेहमीसाठीच लक्षात राहतो. (Amey Hunswadkar Struggle News)
छोट्या-छोट्या भूमिकांपासून सुरूवात करून आता अमेय मुख्य अभिनेता म्हणून नावरूपाला आला आहे. ‘पछाडलेला’मधील त्याचा बाब्या तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. ‘बाबा लगीन… नवरा आला वेशीपाशी…’ असे म्हणत त्याने साकारलेला बाब्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. मात्र तुम्हाला माहित आहे का? ‘पछाडलेला’मधील बाब्या या भूमिकेसाठी अमेयला वेडं ठरवण्यात आलं होतं. याबद्दल स्वत: अभिनेत्याने सांगितलं आहे. अमेयने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीत त्याने त्याची संघर्ष कहाणी सांगितली.
तसंच ही भूमिका त्याला कशी मिळाली? याबद्दलही सांगितलं. याविषयी बोलताना अमेय असं म्हणाला की, “सुलोचना ताईंची पंच्याहत्तरी होती. तेव्हा तिथे महेश कोठारे आले होते आणि ते ‘पछाडलेला’साठी एक कलाकार शोधत होते. तेव्हा त्यांनी सुलोचना ताईंना विचारलं मला “उद्या ऑफिसला येऊन भेट” असं म्हटलं. त्यानंतर मी तिकडे जाताच तिथे महेश कोठारे आणि त्यांचं पूर्ण कुटुंब बसलं होतं. तेव्हा मी त्यांना तिथे काही भाव करुन दाखवलं आणि त्यांनी मला तू माझ्याबरोबर एक चित्रपट करत आहेस असं म्हटलं”.
यापुढे अमेयने असं म्हटलं की, “मला एका वेड्याची भूमिका करायची होती. याबद्दल मी घरी जाऊन सांगितलं. तेव्हा आईने वेड्या मुलाला वेड्याची भूमिका मिळाली असं म्हटलं. मग कोल्हापूरला शूट सुरु झालं तर तिथे भरत जाधव, लक्ष्मीकांत बेर्डे, श्रेयस तळपदे, वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर अशी सगळी माणसे भेटली. तेव्हा एक सीन झाल्यानंतर सर्वांनी माझं कौतुक केलं. मग प्रीमियर झाला आणि चित्रपटानंतर माझं रस्त्यावर पाणीपुरी, भेळ खाणं बंद झालं. लोक वेडं समजून टपल्या मारायचे. उपचार सुरु आहेत का असं विचारायचे. ‘पछाडलेला’नंतर चित्रपट, जाहिराती मिळू लागल्या. आयुष्यात काहीतरी नवीन सुरु झालं आणि हा देवाचा चमत्कार आणि आई-वडिलांचे आशीर्वाद होते असंच म्हणावं लागेल.”
दरम्यान, अमेयने मराठीबरोबर हिंदीमध्येही आपलं नाव कमावलं. ‘तुझे मेरी कसम’ या हिंदी चित्रपटात अमेयला मोठी भूमिका मिळाली. या चित्रपटातील अमेयच्या अभिनयाला समीक्षक, प्रेक्षकांची वाहवा मिळाली. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटात रणबीर कपूरबरोबर काम करून त्याने हिंदी प्रेक्षकांचीही दाद मिळवली. उत्स्फुर्त अभिनय, विनोदाची जाण आणि काम करण्याची जिद्द यामुळे नेहमीच त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पडते.