Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठीच्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ टास्कदरम्यान पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी दादा यांच्याशी बोलताना जान्हवी किल्लेकरची जीभ घसरली होती. टास्कदरम्यान, सुरुवातीला निक्कीने पॅडी दादांना ‘जोकर’ म्हटलं होतं. तर, जान्हवीने त्यांच्या कारकिर्दीचा व अभिनयाचा अपमान केला होता. जान्हवीच्या या घाणेरड्या वक्तव्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणि कलाकारांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. विशाखा सुभेदार, सुरेखा कुडची, अभिजीत केळकर, सिद्धार्थ जाधव त्याचबरोबर पॅडी दादांची मुलगी ग्रीष्मा या सर्वांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जान्हवीला चांगलंच धारेवर धरलं होतं. पॅडी दादांचा अपमान केल्यामुळे ‘भाऊचा धक्का’वर रितेश देशमुखने तिला शिक्षाही सुनावली. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
‘भाऊचा धक्का’वर रितेशने जान्हवीला जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. तेव्हापासून अभिनेत्री जेलमध्ये आहे. जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिल्यामुळे जान्हवीला घरात कुठेही फिरणे बंधनकारक झालं आहे. तसंच तिला घरातील सर्व सुखसोयींचा लाभही घेता येत नाहीये. त्यामुळे याबद्दल जान्हवीला आता वाईट वाटत असून याबद्दल तिने कालच्या भागात माफीही मागीतली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात सूरज व घन:श्याम जान्हवीच्या इथे बसलेले असताना तिथे पॅडी येतात. तेव्हा घन:श्याम माझा जोडीदार आला असं म्हणतो. यावर पॅडी कांबळे “तू बस इथे मला काही प्रॉब्लेम नाही” असं म्हणतात.
यापुढे पॅडी “मला तिच्याबरोबर बसता येत नाही” असं म्हणतात, यावर जान्हवी त्यांना “का काय झालं?” असं विचारते. यावर पॅडी असं म्हणतात की, “तू माझ्यामुळे इथे आहेस. यामुळे मला खूप वाईट वाटत आहे आणि त्यामुळे मला इथे तुझ्याबरोबर बसायला अवघडल्यासारखे वाटत आहे”. यावर जान्हवी असं म्हणते की, “असं अजिबात नाही, मला माझ्या चुकीची शिक्षा मिळाली असून मला ही शिक्षा भोगू द्या. मला माहीत आहे तुम्हाला वाईट वाटत आहे. पण माझ्या चुकीमुळे मी इथे आहे आणि मला मिळालेली ही शिक्षा मी पूर्ण भोगणार आहे. माझ्या चांगल्यासाठी ही शिक्षा मिळाली असून सरांनी दिलेली ही शिक्षा योग्यच आहे”.
दरम्यान, याआधी एकदा जान्हवीने स्वतः जाऊन त्यांची माफी मागितली होती आणि तेव्हा पॅडी यांनी तिला माफही केलं होतं. मात्र जान्हवीने केलेली चूक खूप मोठी असून तिला या चुकीसाठी जेलमध्ये राहण्याची शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे आता ती या शिक्षेतून कधी मुक्त होणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.