Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन्सीला अधिकच महत्त्व आहे. ‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन झाल्यावर त्याला काही विशेषाधिकार मिळतात. यामुळे त्याचं नॉमिनेशनपासून संरक्षण होतं. शिवाय त्याला घरातील काही खास सुखसुविधाही मिळतात. अशातच ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन जवळपास पाच आठवडे होत आहेत. दिवसेंदिवस या घरातील खेळ रंगत चालला आहे. त्यामुळे कॅप्टन्सीसाठीही स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यात घराची कॅप्टन अंकिता होती. त्यानंतर अरबाज कॅप्टन झाला. मात्र त्याला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर दोनच दिवसात गेम पलटला आणि निक्की तांबोळीला कॅप्टन्सी मिळाली. अरबाजने निक्कीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून ही कॅप्टन्सी दिली होती. त्यानंतर आता या आठवड्यात कॅप्टन कोण होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
या नवीन कॅप्टन्सीचा टास्कचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या नवीन प्रोमोमधून घरातील स्पर्धकांमध्ये कॅप्टन्सीसाठी टास्क पार पडणार आहे. या आठवड्यातील कॅप्टन्सीचा टास्क पार पडणार असून घरातील अंकिता, जान्हवी, वर्षा, वैभव आणि सूरजहे स्पर्धक कॅप्टन्सीसाठी उभे राहणार आहेत. या सदस्यांमधून एक जण कॅप्टन होणार आहे. या सदस्यांनाच आपापसात सहमती दर्शवून एक कॅप्टन निवडायचा आहे. पण त्यांच्यात बहुमत न झाल्याने ‘बिग बॉस’ ट्विस्ट आणतात. त्यामुळे बाहेर बसलेले इतर सदस्य कॅप्टन निवडू शकतात असं ‘बिग बॉस’ जाहीर करतात. ‘बिग बॉस’च्या या ट्विस्टने निक्की चांगलीच खूश होते.
गेल्या टास्कमध्ये टीम A जिंकल्यामुळे त्या टीममधील अरबाजने पॅडी, घनश्याम, निक्की व अभिजीत हे स्पर्धक कॅप्टन्सीसाठी उभे राहू शकत नाही असं म्हटलं. अशातच नेमून दिलेल्या स्पर्धकांमध्ये एकमत न झाल्यामुळे आता बाहेर बसलेले सदस्य घरचा नवीन कॅप्टन निवडणार आहेत. त्यामुळे आता बाहेर बसलेले स्पर्धक नक्की कोणाला कॅप्टन म्हणून निवडणार हे येत्या एपिसोडमध्ये समजणार आहे. या नवीन प्रोमोखाली अनेकांनी सूरजला पाठींबा दर्शवला आहे. अनेकांनी तो कॅप्टन व्हावा अशा कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, या आठवड्यात अंकिता, वर्षा, निक्की आणि अरबाज हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. परंतु या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद आहेत. त्यामुळे आता यांच्यातील कोणता सदस्य या आठवड्यात बाहेर जाणार? की कुणीच बाहेर न जाता नवीन सदस्य या घरात येणार आहे का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.