Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ आणि त्यातील स्पर्धकांची जोरदार चर्चा आहे. ‘गुलिगत’ फेम सूरज चव्हाणलाही प्रचंड प्रेम मिळत आहे. मराठी कलाकारांकडून त्याला पाठिंबा मिळतोय. ‘बिग बॉस मराठी’च्या आधीच्या सिझनमधील स्पर्धकांनीही सूरज चव्हाणला पाठिंबा दिला आहे. ‘बिग बॉस मराठी’चे माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदे, पुष्कर जोग, मेघा धाडे यांसह अनेकांनी सूरजला त्यांचा पाठींबा दर्शवला आहे. तसंच महाराष्ट्रातील अनेक चाहते मंडळीदेखील सूरज चव्हाण जिंकावा अशी इच्छा व्यक्त करत आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील एका स्पर्धकानेही त्याला पाठिंबा देत त्याच्या खेळाचे कौतुक केलं आहे आणि हा स्पर्धक म्हणजे अरबाज पटेल. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
अरबाज आजच्या भागात सूरज चव्हाणचे कौतुक करतानाचे पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अरबाज व निक्की यांच्यातील अनेक मतभेद व वाद प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरुन भांडण होत आहे. अशातच गुरुवारच्या भागात ‘मानकापाच्या पाताळ लोक’ या टास्कमध्ये निक्की व अरबाज यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी सूरजने अरबाजची बाजू घेत निक्कीची बोलती बंद केली होती. त्यामुळे त्याच्या या कृतीचे कौतुक अरबाजने केलं आहे. अरबाजने सुरजचे केवळ कौतुकच केलं नाही तर त्याने त्याला स्वत:चा भाऊही म्हटलं आहे.
आणखी वाचा – हार्दिक पांड्याचा घटस्फोट झाल्यानंतरही सुप्रसिद्ध अभिनेत्री त्याच्या प्रेमात, म्हणाली, “तो मला…”
यावेळी अरबाज सूरजला असं म्हणाला की, “सूरज तू आतमध्ये खूप चांगला बोललास. खूप छान. तू आता खूप चांगला खेळत आहेस. तुझ्या भूमिका मांडत आहेस. खूप छान बोललास. तुला कधी काही कळलं नाही किंवा तुला काही करायचं असेल तर तू मला विचारू शकतो. मी तुला सांगेन. मी माझ्या भावासारखं तुला समजावून सांगणार. हे कर किंवा हे करु नको असं… तू कधी माझ्याविरुद्ध असला तरी मी तुला काय चूक आणि काय बरोबर हे सांगणार. आज तू जे काही बोलला, ते मला खूप आवडलं. खूप भारी खेळत आहेस तू”. यापुढे अरबाजने सूरजला मिठीही मारली.
दरम्यान, याआधी ‘बिग बॉस मराठी’चा होस्ट रितेश देशमुखनेही त्याचं कौतुक केलं होतं. ‘बिग बॉस मराठी’ला सुरुवात होऊन आता जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस घरातील स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. घरातील स्पर्धक अंतिम लढतीसाठी एकमेकांना भिडत आहेत. त्यामुळे आता या घरात कोण कोणावर वरचढ ठरणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.