Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात आलेल्या बारामतीच्या सूरज चव्हाणने यंदाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. पहिल्या दिवसापासूनच तो ठाम होता की, ट्रॉफी तोच घेऊन जाणार आणि सूरजने ते सिद्ध करुन दाखवले. अवघ्या राज्यभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तयार झालेल्या ‘बी टीम’मधील सदस्यांनीही त्याचे अभिनंदन केले आहे. अंकिता आणि सूरज दोघेही बी टीमचे सदस्य होते. पॅडी कांबळे आणि सूरज यांचा खास फोटो शेअर करत अंकिताने त्याचे अभिनंदन केले आहे. (Bigg Boss Marathi 5 Ankita Walawalkar)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुरुवातीला सूरजला गेम कळत नव्हता आणि यात त्याला अंकिता व पॅडी यांची उत्तम साथ मिळाली. अंकिता व पॅडी यांनी सूरजला गेम व टास्कपलीकडे जाऊन त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दलच्याही अनेक गोष्टी सांगितल्या आणि शिकवल्याही. यादरम्यान सूरजला नॉमिनेट केल्यामुळे अंकिता बऱ्याचदा ट्रोलही झाली. एकंदरित त्यांच्या या खेळात अनेकदा चढउतार पाहायला मिळाले. यावर अंकिताने आता भाष्य केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले झाल्यानंतर अंकिताने इट्स मज्जाशी संवाद साधला.
यावेळी तिला असा प्रश्न विचारण्यात आला की, “तुम्ही सूरजला पाठिंबा दिला. पण काही गोष्टी त्याच्यावर लादल्या गेल्या असं म्हटलं गेलं. यावर तू सहमत आहेस का?” याबद्दल अंकिता असं म्हणाली की, “नाही, मी यावर अजिबात सहमत नाही. टास्क खेळताना मी कायम त्याचा एक स्पर्धक म्हणून विचार केला. मला माहीत होतं की, प्रेक्षक त्याला खूप प्रेम देणार आहेत. त्या प्रेमामुळे त्याला खूप गोष्टी मिळणार आहेत आणि ते त्याला पेलवलं पाहिजे. त्यासाठी मी त्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. माझी शिकवण्याची पद्धत बऱ्याच जणांना आवडली आणि काहींना ती खटकली”.
यापुढे ती असं म्हणाली की, “पण तो काय लहान नाही. तो मोठा आहे आणि त्याला शिकण्याची इच्छासुद्धा वाटली पाहिजे. त्याने ते शिकलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. बाहेर जाऊन त्याला लग्न करायचं आहे असं तो म्हणत आहे. पण लग्न केल्यावर त्याच्यावर एका मुलीची जबाबदारी येणार आहे आणि तिला सांभाळण्यासाठी काय काय गोष्टी त्याला स्वत:ला आल्या पाहिजेत. हेच मी त्याला समाजवत होते आणि माझी ती पद्धत होती. पण काहींना ती खटकली. पण त्याच्यावर आम्ही कोणतंच मत लादलं नाही”.