कलाकारांबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अशीच एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे ‘बिग बॉस मराठी ५’फेम अंकिता वालावलकर. ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ती सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करा चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. अशातच सध्या सोशल मीडियावर तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत आणि हे फोटो आहेत तिच्या नवीन गाडीचे. अंकिताने नुकतीच एक महागडी आलिशान गाडी खरेदी केली असून याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (ankita walawalkar new car)
अंकिताने नव्या गाडीविषयी पोस्ट शेअर करण्याआधी ‘तुम्ही तयार आहात का?’, ‘ती आलीये, वाट बघतेय’ अशा उत्सुकता वाढवणाऱ्या इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्या होत्या. त्यानंतर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये अंकिताने महागडी गाडी घेतल्याचे समोर आले. होणारा नवरा कुणाल भगतचा हात हातात घेऊन, नव्याकोऱ्या महागड्या गाडी शेजारी उभं राहून तिने हा फोटो पोस्ट केला. ‘आवडी आली’, असं कॅप्शन देत तिने ही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. त्यानंतर आता आणखी काही फोटो पोस्ट करत तिने आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
अंकिताने नवीन गाडीबरोबरचे फोटो पोस्ट करत असं म्हटलं आहे की, “फार मोठी स्वप्नं बघु नये, अंथरूण पाहून पाय पसरावेत हे ऐकत मोठे झालो. पण मोठी स्वप्नं बघायला हरकत काय आहे? आणि अंथरूण लहान आहे तर अंथरूण मोठं घेऊ असा विचार करत इथपर्यंत पोचले. जेव्हा जेव्हा मी एक पाऊल मागे गेले आहे, ते नेहमीच पुढे झेप घेण्यासाठी. गावातुन मुंबईत येणं, त्यानंतर २ बहीणींना मुंबईत आणणं, भाड्याच घर शोधणं, मुंबईत राहणं, स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करणं हा प्रवास सोप्पा नव्हता. आई-बाबांनी जो विश्वास दाखवला त्यामुळेच एवढं करू शकले”.
यापुढे अंकिताने असं म्हटलं आहे की, “आज ही घेतलेली गाडी दिखाव्यासाठी नाही तर अंथरूण व्यवस्थित असल्यामुळे घेतली आहे. मी तर म्हणेन मोठी स्वप्नं बघा, कोणतही काम करायला लाजू नका, कधीतरी नमतं घ्या, कधीतरी स्वतःहून बोला. पण हे होत नाही, आता कसं होईल, म्हणून थांबू नका”. यापुढे तिने मालवणी भाषेत “माकाच बघा यंदा आवडीतसुन हापूस आंबे विकतलंय” असंएए गंमतीत म्हटलं आहे. दरम्यान, अंकिताच्या या पोस्टला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी तिला या नवीन गाडीनिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.