कोकणात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अनेक चाकरमनी गणेशोत्सवासाठी कोकणात आले आहेत. कोकणातील गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच आपल्या कोकणचा चेंडू अंकिता वालावलकर मात्र ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५च्या घरात आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अंकिता खूप मिस करताना दिसत आहे. घरातील नेहमीच चर्चेत असणार पात्र म्हणजे कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर. यंदा अंकिता स्पर्धक म्हणून ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी झाली आहे. कोकण व मालवणी भाषेवरील प्रेम ती आशयघन कंटेन्ट मार्फत चाहत्यांच्या समोर मांडताना दिसते. (Ankita Walavalkar Emotional)
अंकिताला गणपतीत गावी जाता येणार नसल्याने काही दिवसांपूर्वीच ती भावुक झाली होती. अशातच ‘बिग बॉस’ मराठीच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने घरातील सदस्यांना एक मोठं सरप्राइज दिलं. ते म्हणजे रितेश देशमुख स्वतः ‘बिग बॉस’च्या घरात गेला आणि त्याने सदस्यांना सरप्राइज दिलं. रितेशने प्रत्येक सदस्याला त्यांच्या घरातील सदस्यांचे व्हिडीओ दाखवले. यावेळी अंकिता वालावलकरच्या आई-वडिलांनी व्हिडीओद्वारे अंकिताशी संवाद साधला.
अंकिताचे वडील सुरुवातीला म्हणाले, “तुला ‘बिग बॉस’च्या घरात पाहून खूप समाधान वाटलं. पण कधी बोलून दाखवलं नाही. आता आम्ही सर्वांना अभिमानाने सांगतो की अंकिता ही आमची मुलगी आहे”. अंकिताच्या वडिलांचे शब्द ऐकून अंकिताला रडू आलं. त्यानंतर अंकिताची आई म्हणाली, “बाळा तू कशी आहेस?. यावर्षी गणपतीत तुझी खूप आठवण आली. ऋषी पंचमीची भाजी करताना, मोदक करताना व्हिडीओ करायला सारखी तुझी घाई असायची. तू छान खेळत आहेस. तुझ्या खेळातील प्रामाणिकपणा, तुझी निर्णय घेण्याची क्षमता बघून खूप बरं वाटतं. तू अशीच खेळ. खंबीर राहा. आणि आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत”.
यानंतर अंकिता म्हणाली, “वाटलं नव्हतं की बाबा बोलतील. ते कधीच जास्त बोलत नाहीत”, असं म्हणत रडू लागली. अंकिता ही मूळची कोकणातील असल्याने दरवर्षी ती तिच्या घरी गणेशोत्सवाला जाते. यंदाही गणेशोत्सवात अंकिताचे कुटुंब तिला मिस करताना दिसले.