‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व हे मानवी भावभावनांचे होते. या घरात सुरुवातीला एकमेकांचे शत्रू असलेले स्पर्धक आता एकमेकांचे चांगलेच मित्र झाले आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’चे पर्व संपले असले तरीही या घरातील स्पर्धक एकमेकांबरोबरचे नाते जपताना पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात सूरजने अनेकांबरोबर खास नाते निर्माण केले. पॅडी, अंकिता, डीपी, निक्की यांच्यासह जान्हवीबरोबर त्याने खास नाते निर्माण केले. या घरात त्याने अंकिता व जान्हवी यांना आपली बहीण मानली. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातील जान्हवी व सूरज यांच्यात अनेक खटके उडालेले पाहायला मिळाले. मात्र, कालांतराने या दोघांच्या वादाचं रुपांतर भावा-बहिणीच्या सुंदर अशा नात्यात झालं. (Janhavi Killekar Suraj Chavan Bhaubeej)
रक्षाबंधनाच्या सणाला जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण यांनी ‘बिग बॉस’च्या घरात रक्षाबंधन साजरं केलं होतं. तेव्हाच अभिनेत्रीने आपण भाऊबीज सुद्धा साजरी करायची असं सूरजला सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वीच जान्हवीने सूरजच्या मोढवे गावी जाऊन त्याची भेट घेतली होती. यावेळी ती भाऊबीजेला पुन्हा येईन असं म्हणाली होती. अखेर अभिनेत्रीने तो शब्द खरा करून दाखवला आहे. जान्हवीने सूरजच्या गावी जात त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवला. जान्हवीला पाहून सूरजही खूप खुश दिसला आणि त्याने तिला पाहताच घट्ट अशी मिठी मारलेली पाहायला मिळाली.
दिवाळीनिमित्त जान्हवीने बिग बॉसचं ब्रेसलेट घेतल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओखाली अनेकांनी तिला सूरजबरोबर भाऊबीज साजरी करणार की नाही असं विचारलं होतं. यावर जान्हवीने “जाणार आहे” असं उत्तर दिलं होतं. हा शब्द आता जान्हवीने खरा केला आहे. जान्हवीने सूरजबरोबर भाऊबीज साजरी केली असून याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचबरोबर या फोटोसह तिने असं म्हटलं आहे की, “तु फक्त एक हाक मार मी कायम तुझ्या सोबत आहे”. जान्हवीबरोबर सूरजच्या गावी जान्हवीचा नवरा व तिचा मुलगाही होता.
आणखी वाचा – “घन:श्यामवर कोणी विश्वास ठेवू नये”, सूरजच्या लग्नावरुन जान्हवीचं भाष्य, म्हणाली, “आवडीची मुलगी…”
दरम्यान, सूरजचं बालपण अत्यंत बेताच्या परिस्थिती गेलं. लहानपणीच त्याच्या डोक्यावरील आई-बाबांचं छत्र हरपलं. यानंतर त्याच्या बहिणींनी त्याचा सांभाळ गेला. पण, ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश घेतल्यावर सूरज आता अवघ्या महाराष्ट्राचा लाडका मुलगा झाला आहे. घरामध्ये त्याला जान्हवी, अंकिता, इरिनाच्या रुपात आणखी काही बहिणी मिळाल्या आहेत आणि या बहीणींबरोबरचे नाते तो निभावत आहे. सूरज-जान्हवीच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.