‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व आता संपले असले तरी या पर्वातील प्रत्येक स्पर्धकाची चर्चा होताना दिसत आहे. बारामतीच्या सूरज चव्हाणने या शोचे विजेतेपद पटकावले. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला त्याला खेळ कळत नव्हता. पण हळूहळू त्याने आपली या खेळातील रंगत दाखवायला सुरुवात केली आणि अखेरपर्यंत जात या शोचे विजेतेपदही जिंकले. ‘बिग बॉस’च्या घरात सूरजच्या लग्नाविषयीचा मुद्दा बराच गाजला. या घरात सूरजने अनेकदा त्याच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. त्याला नेमकी कशी मुलगी हवी आहे? याबद्दल त्याने अनेकदा भाष्य केलं आहे. अशातच आता त्याच्या लग्नावर जान्हवीने भाष्य केलं आहे. (Janhavi Killekar on Suraj Marriage)
‘बिग बॉस’ संपल्यानंतर घरातील स्पर्धक एकमेकांच्या भेटी घेत आहेत. यानिमित्ताने अनेकजण सूरजच्या गावी जाऊन त्याला भेटत आहेत आणि त्याच्याबरोबर खास क्षण घालवत आहेत. इरीना, धनंजय, वैभव, पुरुषोत्तमदादा तसेच घन:श्याम यांनी सूरजच्या गावी जाऊन भेट घेतली असल्याचे पाहायला मिळाले. अशातच नुकतीच अभिनेत्री जान्हवी किल्लेकरदेखील सूरजची भेट घ्यायला त्याच्या गावी गेली होती. याचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी स्थानिक वृत्तवाहिनीकडून जान्हवीला सूरजच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले.
यावेळी प्रश्न विचारणाऱ्याने “घन:श्यामने सूरजला मुलगी बघितली आहे तशी तुमच्या नजरेत कुणी आहे का?” असं विचारलं. यावर जान्हवी घन:श्याम विषयी असं म्हणाली की, “घन:श्यामवर कोणी विश्वास ठेवू नये. तो फसवतो”. यापुढे ती सूरजच्या लग्नाबद्दल असं म्हणाली की, “माझ्या डोक्यात तरी असं कुणी नाही. सूरज त्याच्यासाठी मुलगी नक्कीच शोधेल आणि त्याने ती शोधल्यानंतर मला तो नक्कीच दाखवेल. फक्त सूरजला त्याच्या आवडीची मुलगी मिळूदेत असं मला वाटतं”.
आणखी वाचा – Bigg Boss नंतर जान्हवी किल्लेकर पहिल्यांदाच गेली माहेरी, आईने औक्षण करत केले स्वागत, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात सूरजने याआधी एका अनाथ मुलीबरोबर लग्न करुन तिच्या आयुष्यातलं हे एकटेपण दूर करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्याने त्याचं लग्न अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे असंही म्हटलं आहे. तसेच ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याने सध्या कामावर लक्ष देणार असल्याचेही सांगितले होते.