Badlapur Sexual Assault Case : बदलापूरमधील आदर्श विद्या मंदिर शाळेमध्ये चार वर्षांच्या लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर मंगळवारी बदलापुरात नागरिकांचं रौद्ररुप पहायला मिळालं. कोलकाता महिला डॉक्टरवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच बदलापूरमधील घटनेने देश पुन्हा हादरला. शाळेत गेलेल्या चिमुकल्या लेकींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले. याबद्दल निषेधव निदर्शने करण्यात आली. या घटनेवर अनेक सेलिब्रिटींनी कडक शब्दांत संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातल्या आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणीही अनेकांनी केली आहे. बदलापूरमधील या आमनुष घटनेवर मराठी कलाकारांकडून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मराठीतील अनेक कलाकार मंडळींकडून या घटनेबद्दल सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला आहे. अशातच अभिनेता रितेश देशमुखने पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे. (Badlapur Sexual Assault Case News)
रितेशने एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर बदलापूर प्रकरणासंबंधीत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपला संताप, राग व चीड व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “एक पालक म्हणून मी खूप दुखावलो आहे. वैतागलो आहे आणि माझा प्रचंड संताप होत आहे. शाळेत गेलेल्या दोन चार वर्षांच्या मुलींवर तिथल्या पुरुष सफाई कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केले. शाळा ही मुलांसाठी स्वत:च्या घरा इतकीच सुरक्षित अशी जागा असायला हवी. या प्रकरणातील त्या नराधमाला, राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात दोषींना ज्याप्रकारे शिक्षा द्यायचे, चौरंग करायचे. हेच कायदे आपल्याला पुन्हा आणण्याची गरज आहे”.

रितेशच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याच्या मताशी सहमती दर्शवली आहे. अनेकणी त्यांचं म्हणणं बरोबर असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होताना दिसत आहे. तसंच या प्रकरणी प्रसाद ओक, शिवाली परब, अभिजीत केळकर, सुरभी भावे, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर यांसारख्या अनेकांनी राग व्यक्त केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल्वे रुळावर उभे राहून घोषणा देऊन आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा केली. बदलापूरच्या शाळेत घडलेली घटना अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे.