Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं यंदाचं पाचवं पर्व विशेष गाजताना दिसत आहे. यंदाच्या या पर्वात सगळेच स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसले. अनेकदा वाद झाल्यानंतर स्पर्धक मंडळी समजुतीने एकत्र येताना दिसतात. यंदाच्या या पर्वाचे आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. हे पर्व १०० दिवसांचे नसून ७० दिवसांचे असणार आहे. ‘बिग बॉस’ने यंदाचे पर्व ७० दिवसांचे असणार असल्याची अधिकृतरीत्या घोषणा केली. शिवाय त्यांनी ग्रँड फिनालेची तारीखही जाहीर केली. आता काही दिवस शिल्लक असताना ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांची कुटुंबीयांबरोबरची भेट पाहायला मिळाली.
कालच्या भागात अभिजीत, डीपी यांचे कुटुंब ‘बिग बॉस’च्या घरात आलेले दिसले. कुटुंबियांना तब्बल दोन महिन्यांनी भेटल्यानंतर साऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. धनंजय पोवारच्या घरुन त्याचे आई-बाबा व बायको त्याला भेटायला आले होते. बाबांना पाहून डीपी ढसाढसा रडला, शिवाय लेकाला दोन महिन्यांनी पाहिल्यानंतर त्याच्या वडिलांनाही अश्रू अनावर झाले. घरात आल्यानंतर डीपीने सगळ्यांची वडिलांना ओळख करुन दिली. यावेळी डीपीने निक्कीची करुन दिलेली ओळख तिला खटकली.
डीपीने निक्कीची ओळख वेगळ्या नावाने करुन दिली हे काही निक्कीला पटलं नाही, यावरुन तिने डीपीला जाबही विचारला. शिवाय काल मस्करीत डीपीने निक्कीच्या साडीत खिळा फेकला. हेदेखील निक्कीला पटलं नाही. त्यावेळी तिने अंकिताला डीपीला समजावयाला सांगितलं. समोर आलेल्या प्रोमोमध्ये, निक्की डीपीला म्हणते, “तुम्ही माझं दुसरं नाव घेऊन ओळख करुन देत आहात ते मला अजिबात आवडलेलं नाही”. यावर उत्तर देत डीपी म्हणाला, “ऐक ऐक, त्याच्याबद्दल खरंच सॉरी. अंकिता मला म्हणाली की निक्कीला थोडंसं वाईट वाटलं. मी तुझ्याशी मगाशी बोलणार होतो”. यावर निक्की म्हणते, “हो कारण माझं जे नाव आहे त्या नावाने मला लोक ओळखतात”.
यावर डीपी म्हणतो, “कोणत्याही वाईट हेतूने मी केलं नाही. आणि तिने सांगितलं तेव्हा मी तुला सॉरी म्हणायला येणार होतो. मी खरंच हात जोडून माफी मागतो आणि मला मनापासून मागायची आहे. ओळख दुसरी सांगणं असा माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. छोटा भाऊ समजून मला माफ कर. अगदी अंतःर्मनापासून मी माफी मागतो. यावर निक्की डीपीला “ठीक आहे. काळजी घ्या”, असं म्हणते.