Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे असून येत्या ६ ऑक्टोबर रोजी या शो चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून यंदाचा ‘बिग बॉस मराठी’चा शो अवघ्या ७० दिवसांत बंद होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या आणि अखेर या चर्चांवर स्वतः ‘बिग बॉस’नेच उत्तर देत पूर्णविराम दिला. हा शो आता अंतिम टप्प्यात आल्यामुळे नुकताच या घरात फॅमिली स्पेशल एपिसोड पार पडला. नुकत्याच झालेल्या गुरुवारच्या भागात घरात वर्षा, अभिजीत व डीपी यांच्या घरातील कुटुंबीयांनी हजेरी लावली.
आजच्या भागात उर्वरीत सदस्यांच्या कुटुंबियांची घरात एंट्री होणार आहे, यावेळी निक्कीची आईदेखील घरात येणार आहे आणि याचा एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमोमध्ये निक्कीची आई तिला घरात भेटायला आली असून यावेळी ती अरबाजबद्दलच्या काही गोष्टी निक्कीला सांगणार आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमोमध्ये निक्कीच्या आईने तिला अरबाजबद्दल काही गोष्टी सांगताच निक्कीने अरबाजबरोबरचं तिचं नातं संपवलं असल्याचे म्हटलं आहे.
या नवीन प्रोमोमध्ये निक्कीची आई तिला असं म्हणते की, “अरबाज चुकीचा चालला आहे. त्याने असं नाही करायला पाहिजे. त्याचा साखरपुडा झालेला आहे असं म्हणतात”. यानंतर निक्की जान्हवीकडे अरबाजबद्दल असं म्हणते की, “आता या घरात अरबाज आला तर मी पागल होईन”. त्यानंतर निक्की असं म्हणते की, “हे अरबाज-निक्की जे होतं ना ते आता संपलं आहे”. यापुढे निक्की ‘बिग बॉस’ला अरबाजचे कपडे फेकून द्या असंही म्हणते. त्यामुळे आता निक्की-अरबाज हे नाते संपले आहे असं निक्की स्वत:चं जाहीर करते.
दरम्यान, या घरात निक्की व अरबाज यांच्या नात्याची बरीच चर्चा रंगली होती, भाऊच्या धक्क्यावर अरबाजने तो कमिटेड असल्याचे कबूल केल्यानंतरही त्याची निक्कीबरोबर जवळीक होती. या घरात दोघांमध्ये अनेकदा वादही झाले. पण तरीही त्यांचे खास नातेही प्रेक्षकांना पाहायला मिळाले. अरबाज बाहेर गेल्यानंतर ती खूपच भावुक झाली होती. मात्र आता स्वत: निक्कीने हे नाते संपले असल्याचे जाहीर केलं आहे