Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला सुरु होऊन आता जवळपास एक महिना उलटला आहे. ‘बिग बॉस’च्या पाचव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच नॉमिनेशन टास्क सुरू झाला आहे. या नॉमिनेशनसाठी मानकापाचा टास्क ठेवण्यात आला होता. मानकाप्यापासून वाचण्यासाठी स्पर्धकांना संपूर्ण आठवडाभर ‘बिग बॉस’ यांनी नेमून दिलेल्या जोडीनेच फिरायचं होतं. यावेळी घरातील सर्व स्पर्धकांनी स्वत: या घरात राहण्याचे योग्य कारण देत इतर स्पर्धकांना नॉमिनेट केले आणि या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील एकूण चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत व कॅप्टन निक्की तांबोळी हे चार स्पर्धक घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
त्यामुळे आता या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार? याबद्दल स्पर्धकांप्रमाणेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच या आठडव्यात आवडत्या स्पर्धकाला सुरक्षित करण्यासाठीच्या वोटिंग लाईन्सही बंद आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या आठवड्यात घराबाहेर नक्की कोण जाणार? याबद्दल संभ्रमावस्था आहे. अशातच बिग बॉसच्या घरातही निक्की व अभिजीत यांच्यात आठडव्याच्या नॉमिनेशन टास्कवरुन चर्चा रंगली आहे. नॉमिनेशनवरील चर्चेदरम्यान अभिजीत व निक्की या आठडव्यात वर्षाताई घराबाहेर जाणार असल्याचे म्हणत आहेत. कारण पहिल्या आठडव्यानंतर त्यांचा या घरातील खेळ फारसा दिसून येत नाहीये.
अभिजीत व निक्की यांच्यात आठडव्यातील नॉमिनेशन टास्कवरुन चर्चा होते. तेव्हा अभिजीत निक्कीला “कोण जाणार?” असं विचारतो. यावर निक्की वर्षा उसगांवकरांचे नाव घेते. यानंतर निक्की अभिजीतला वर्षा उसगांवकरांच्या प्रसिद्धीबद्दल विचारते. यावर अभिजीत असं म्हणतो की, “त्यांची प्रसिद्धी आहे. पण इथे ते लोक आहेत जे हा शो रोज बघतात. त्यामुळे इथे वर्षा उसगांवकरांना त्यांच्या लोकप्रियतेचा व प्रसिद्धीचा किती फायदा होईल माहीत नाही आणि त्या फार दिसतही नाहीयेत. पहिल्या आठडव्यात त्या खेळल्या मात्र त्यानंतर त्यांचा खेळ फारसा काही दिसून आला नाही”.
यापुढे निक्की त्याला असं म्हणते की, “खरंय… आता तर त्या पूर्ण विझल्या आहेत. या आठवड्यात त्या काहीच करत नाहीयेत”. यापुढे अभिजीत निक्कीला असं म्हणतो की, “त्यांना आम्हाला आमच्या ग्रुपमध्ये सांभाळून घ्यावं लागतं. टास्कबद्दल आणि सर्व गोष्टीबद्दल त्यांना समजून घ्यावं लागतं. त्या काय करतील? कसं करतील? सर्व ठीक करतील की नाही? याचं आम्हाला टेंशन असतं”. त्यामुळे आता निक्की व अभिजीत यांच्यानुसार या आठवड्यात नक्की वर्षा उसगांवकर घराबाहेर जाणार का? की यात काही नवीन टास्क येणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.