Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेल्या काही भागात सदस्यांमधील अनेक स्थित्यंतरे पाहायला मिळाली आहेत. कुणी क्षणार्धात मित्र झाले तर कुणी शत्रू. त्यात निक्की व अरबाज यांच्या नावाची तर घरात कायमच चर्चा होताना पाहायला मिळत आहे. निक्की व अरबाज यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचं काही दिवसांपूर्वी पाहायला मिळालं. निक्की व अरबाज यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने टीम एमधील सदस्यांचे व्हिडीओ निक्कीला दाखवल्यानंतर टीम एमध्ये फूट पडली. यामुळे निक्कीने अरबाज, जान्हवी आणि वैभव यांच्या ग्रुपपासून फारकत घेतली. निक्की व अरबाज यांच्यात मोठा राडा झाला, ज्यामध्ये अरबाजने ‘बिग बॉस’च्या घरात तोडफोड केली. यानंतर ‘बिग बॉस’ने अरबाजची कॅप्टन्सीची उमेदवारी काढून घेतली. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
अभिजीतबरोबरच्या जोडीमुळे अरबाजला निक्कीबरोबरचे वागणं खटकत होते. त्यामुळे त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं, नंतर दोघांनी ते भांडण सोडवलं. तेव्हापासून निक्की व अरबाज परत एकत्र गेम खेळत आहेत. निक्की म्हणेल ते ऐकताना अरबाज दिसत आहे. त्यांचं हेच वागणं घरातील अनेकांना खटकलं. निक्कीपासूनचा विरह अरबाजला सहन न झाल्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी त्याला समजून घेतलं. पण निक्कीबरोबरचे भांडण सोडवल्यानंतर अरबाज घरातील सर्व सदस्यांच्या विरोधात गेला आणि त्याच्या याच वागण्याचा आज भाऊचा धक्क्यावर समाचार घेतला जाणार आहे. आजच्या भागात भाऊचा धक्कामध्ये रितेश अरबाजच्या बदलेल्या वागण्याबद्दल अभिजीतला विचारणार आहे.
यावेळी अभिजीत त्याचं उत्तर देत असं म्हणतो की, “मला विश्वास होताच की, अरबाज असा फिरणार आहे. त्यामुळे मला खूप वाईटही वाटलं. त्याने इतकी मोठी पलटी मारली हे मला तेव्हा वाटलं नव्हतं. एखादा माणूस आवडतो तर त्याची एक नैसर्गिक पद्धत असते. माणूस हळूहळू बदलतो. अरबाजने बाहेर बसून आमच्याबद्दल असं म्हटलं होतं की, घरातल्यांनी असं काय केलं आहे? त्यांना मी बोललो नव्हतो माझ्याजवळ या किंवा मला मदत करा. तेच लोक माझ्याजवळ आले. त्यामुळे मला वाटतं की, अरबाजकडून हा सर्व सदस्यांबरोबर झालेला विश्वासघात आहे”.
यापुढे अभिजीतने असं म्हटलं की, “वैभवने तर निक्कीच्या कॅप्टन्सी रुममध्ये जाऊन तिला ओरडून बोलला होता की तू मला काहीही बोल पण अरबाजला काही बोलू नको. त्याच्याजवळ जाऊ नको. पण अरबाज त्याच्याबरोबरही अगदी क्षणात फिरला. त्यामुळे असा क्षणात फिरणारा माणूस मी कधीच पाहिला नाही”. दरम्यान, आजच्या भाऊचा धक्कामध्ये रितेश अरबाजसह निक्कीच्या वागण्याबद्दलही कान टोचणार आहे. तसंच तिला शिक्षादेखील करणार आहे. तसंच निक्की सोडून आणखी कोणाची शाळा घेतली जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.