Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी च्या घरात कायम आपल्या बेताल वक्तव्यांनी चर्चेत राहणारी सदस्य म्हणजे निक्की तांबोळी. निक्कीने आजवर अनेक बेताल वक्तव्य करत घरातील इतर सदस्यांचा अपमान केला आहे. घरातील सदस्यांना कायम कमी लेखणं आणि अपमानास्पद वागणूक देणं यात निक्कीने परिसीमा गाठली आहे आणि याबद्दल तिचे वेळोवेळी कानही टोचले गेले आहेत. पण सुधारेल ती निक्की कसली. माफी मागूनही निक्की चुका करत आली आहे. यापैकी नुकतीच झालेली एक चूक म्हणजे निक्कीने आर्याच्या वडिलांबद्दल केलेलं अपमानास्पद वक्तव्य. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
बिग बॉस मराठीच्या घरात सातव्या आठवड्यात घराच्या कॅप्टनपदी बहुमताने सूरजची निवड करण्यात आली आहे. ‘टीम B’सह निक्की-अरबाजने यांनीदेखील सूरजच्या कॅप्टन्सीसाठी पाठिंबा दिला होता. यानंतर तरी घर शांत राहील अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मात्र, घडलं काहीतरी वेगळंच…सूरज कॅप्टन झाल्यावर अगदी पहिल्याच दिवशी चहा बनवण्यावरून आर्या व निक्कीमध्ये जोरदार भांडणं झालं आणि याचं कारण होतं चहाचे भांडे न घासणे.
निक्कीने स्वत:साठी केलेल्या चहाची भांडी घासण्यास नकार दिला. त्यामुळे घरात मोठी वादावादी झाली. आर्याने नंतर ही भांडी उचलून निक्कीच्या बेडवर ठेवली. तरीही निक्की ऐकली नाही म्हणून आर्याने शेवटी उरलेली भांडी उचलून लपवली. यानंतर झालेल्या भांडणात निक्कीने आर्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली. यावर आर्याने प्रचंड संतापून “बाप काढायचा नाही…” असं तिला सांगितलं. सूरजने देखील आर्याला पाठिंबा देत बाप नको काढू असं उत्तर दिलं आहे. याआधीही निक्कीने टास्कदरम्यान असंच बेताल वक्तव्य केलं होतं, तेव्हा डीपी दादांनी तिला समज दिली होती. मात्र निक्कीच्या बाबतीत ये रे माझ्या मागल्या.. हेच होत असलेलं पाहायला मिळत आहे.
त्यामुळे एखाद्या क्षुल्लक कारणामुळे एखाद्याच्या वडिलांचे नाव घेत अपमानास्पद वक्तव्य करणे हा कितपत योग्य आहे? आणि स्पर्धक म्हणून खेळताना अशा अपमानास्पद वक्तव्यामुळे माणुसकी आणि संस्कार विसरले जातात की काय? असा प्रश्न पडतो. त्यामुळे आता निक्कीच्या वागणुकीबद्दल तिला काय कठोर शिक्षा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅप्टन्सी काढून घेण्यापलीकडे बिग बॉस हिला काय शिक्षा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.