Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या या नवीन पर्वाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या घरातील सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणचा साधेपणा लोकांना भावतो आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणपती विशेष भागात सूरजने केलेल्या कृतीने अनेकांची मनं जिंकली. गणेशोत्सवानिमित्त झालेल्या विशेष भागात ‘बिग बॉस मराठी’च्या स्पर्धकांना उकडीचे मोदक देण्यात आले होते. यावेळी सगळ्यांनी मोदक खाल्ले. सूरजलादेखील मोदक देण्यात आला, पण तेव्हा सूरज रितेशला “एक मोदक गणपती बाप्पाला दिला तर चालेल का?” असं म्हणाला आणि त्याची हीच कृती कौतुकास्पद ठरली. सूरज चव्हाणने स्वत: मोदक खाण्याआधी गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून ठेवला. (Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan)
सूरज चव्हाणच्या या कृतीने त्यानी सर्वांचीच मनं जिंकली. अशातच नुकत्याच झालेल्या कॉईन्सच्या टास्कमध्ये “मी साधा माणूस आहे. मला पिझ्झा, बर्गर नाही तर भाकरी-कालवण आवडतं” असं म्हटलं. ‘बिग बॉस’च्या घरात शुक्रवारच्या भागात ज्यांच्याकडे सर्वात जास्त कॉईन्स आहेत त्या कोणत्याही स्पर्धकाला एखादा लक्झरी पदार्थ विकत घेण्याची संधी ‘बिग बॉस’ने दिली होती. यात केक, बिर्याणी आणि पिझ्झा असे तीन पदार्थ असतात. मात्र सूरज यापैकी कोणताही पदार्थ विकत घेण्यास स्पष्ट असा नकार देतो. सूरजचा हा साधा भोळा त्याच्या चाहत्यांना आणि महाराष्ट्रातील अनेकांना आवडला. अशातच आता त्याने पुन्हा एकदा केलेली एक कृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या शनिवारच्या भाऊचा धक्कामध्ये रितेशने सर्वांसाठी एक गाणे वाजवले. यावेळी गाणं वाजताच सूरजने आपले हात जोडले. भाऊचा धक्कामध्ये रितेशने असं म्हटलं की, “घरात रोज सकाळी एक गाणे वाजते हे मी टीव्हीवर बघतो. पण मला हे आता प्रत्यक्ष पहायचे आहे. त्यामुळे मी आता एक गाणं वाजवणार असून त्यावर सर्वांनी डान्स करायचा आहे”. यापुढे रितेश सूरजला काय सूरज एकदम तयारी” असंही विचारतो. यावर सुरज हसत हसत “हो सर” असं म्हणतो. यानंतर ‘हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हे गाणं वाजतं आणि हे गाणं वाजताच सूरज नकळत आपले हात जोडतो. शाळेत न गेलेला सूरज या प्रार्थनेमधील शब्द अचूक ओळखून त्याचा अर्थही समजतो.
त्यामुळे सूरजची ही कृती कौतुकास्पद ठरत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरजने अनेकदा केलेल्या साध्या सोप्या कृतीमुळे अनेकांची मनं जिंकली आहेत. अशातच त्याची ही साधी सोपी कृतीदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओखाली प्रेक्षकांनी त्याचे कौतुक करत “सूरजने माणुसकी दाखवली”, “सूरज प्रत्येक गोष्टीत मन जिंकतो”, “माणुसकी फक्त सूरज आणि आंकिताने दाखवली”, “सुरजकडे बघून छान वाटलं’ अशा अनेक कमेंट्सद्वारे सूरजचे कौतुक केलं आहे.