सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’ची चर्चा होताना दिसून येत आहे. हे पाचवं पर्व असून यामध्ये दिवसादिवसाला अनेक ट्विस्टदेखील येताना दिसून येत आहेत. घरातील स्पर्धकांमधील वाददेखील समोर येताना दिसून येत आहेत. अशातच आता नवीन वाद उद्भवला आहे. घरातील स्पर्धकांसाठी ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क देण्यात आला होता. यावेळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून जान्हवीवर आता टीका होत आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार आता पॅडीसाठी पुढे सरसावले आहेत. (Vishakha subhedar on pandharinath kamble)
नुकत्याच झालेल्या भागामध्ये जान्हवीने पॅडी यांच्या करिअरबद्दल अपमानास्पद भाष्य केले. तिने पॅडीला ‘जोकर’, ‘विदूषक’ म्हणत ‘त्यांनी आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग केली आहे”, असे म्हणाली. याआधी निक्कीनेदेखील वर्षा उसगांवकर यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दलही भाष्य केले. यावरुन आता अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी दोन्ही कलाकारांना साथ देण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, “केहता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना. पॅडी तुला खूप शक्ती मिळो. विनोदी कलाकाराला बाकीचे लोक कायमच हलक्यात घेतात. निकी बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना “जोकर “म्हणालात ! आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो तो म्हणजे जोकर. हे काम बापजन्मात तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी हिम्मत लागते ती तुमच्याकडे नाही. गेली अनेक वर्ष हे काम तो करतोय. उथळ पाण्याला खळखळाट फार हे विधान निकी आणि जान्हवीसाठी एकदम योग्य आहे. अगं मुली तुझा जन्म कदाचित २००० सालचा असावा आणि पॅडी यांनी १९९८ साली काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू, बंड्या ज्याचे महाराष्ट्राला अजूनही वेड आहे. ‘येड्यांची जत्रा’मधला नयनराव अशी अनेक पात्र त्यांनी रंगवलेली आहेत. पंढरीनाथ तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नाहीत”.
पुढे त्यांनी लिहिले की, “गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात न्हाऊन निघालेले पंढरीनाथ आहेत ते. तसेच त्यांच्या विनोदाच्या टाइमिंगयाबद्दल तर तू बोलायचंस नाहीस. त्यांच्या नखाचीही किंमत नाही आहे तुला आणि वर्षाताईंचा तुम्ही खूप अपमान केला आहे आतापर्यंत. गेम आहे, गेम आहे असं म्हणत मी दोन तीन एपिसोड पहिले पण तुम्ही तर थांबतच नाही आहात. वर्षाताईंनी मराठी सिनेमाला ग्लॅमर मिळवून दिले. त्याकाळी सोशल मीडिया नव्हता. त्यांनी त्यांच्या बळावर त्याकाळातल्या कलाकारांवरच्या प्रेक्षक प्रेमामुळे नाटक,सिनेमे हाउसफुल्ल व्हायचे..! त्यांना कमी लेखणं बंद करा. जरा बोलताना भान ठेवा. विनोदामुळे तो माणूस जगला, टिकला. पन्नाशी पूर्ण झाली तरीही आजही स्लॅपस्टिकचा बाप आहे. तो शांत आहे ह्याचा अर्थ असा नाही की त्याला आत्मसन्मान नाही”.
त्यानंतर त्या म्हणाल्या की, “आता थोडं पॅडीबद्दल बोलते. पॅडी माऊली, तुझा खेळ तू. खुप सभ्यपणे, हुशारीने, संयम बाळगून खेळतो आहेस मित्रा…! आता तर तू जोरात आलायस..! इतकं हिडीस बोलल्यानंतरही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीत त्याबद्दल तुला सलाम. खचून जाऊ नकोस…! टास्कमध्ये जोर लावून खेळ मित्रा..! तू वयाने मोठा आहेसच आणि शिवाय माणूस म्हणून मोठा आहेस हे आज दाखवून दिलस. एक उत्तम प्रतिक्रिया देणारा असूनही तू त्यावर अजिबात प्रतिक्रिया दिली नाहीस. त्याबद्दल तुझे खुप खुप कौतुक…! बाकी तुझ्या खेळांनी मज्जा आणली. तुझं टायमिंग भन्नाट आहे. निकीच्या अंगणात तू जाणारच नाहीस हे तू बरं नाही करत. खरंतर जा रोज जा आणि तिचे वाळत घातलेले पापड असतील त्याच्यावर नाच. तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडाचा…! कोणाच्याही करियरवर बोलायचं नाही”.
दरम्यान आता मराठी मनोरंजन क्षेत्रातून पॅडीला बोलल्या गेलेल्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच नेटकऱ्यांनी देखील जान्हवी व निकी यांच्यावर सोशल मीडियाच्या मध्यमातून टीका केल्या आहेत.